इंडियन प्रीमियर लीग २०२६ च्या मिनी लिलावाच्या तयारीला आता वेग आला आहे. १६ डिसेंबर रोजी होणाऱ्या या लिलावापूर्वीच अनेक फ्रँचायझींनी आपल्या महत्त्वाच्या खेळाडूंना रिलीज केले. यात, गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा महत्त्वाचा सदस्य असलेला अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यर याचाही समावेश आहे. आयपीएलच्या लिलावापूर्वी फ्रँचायझींचे लक्ष वेधण्यासाठी त्याच्याकडे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ मध्ये बिहारविरुद्धच्या सामन्यात मिळालेल्या संधीचे त्याने सोने करून दाखवलं
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ मध्ये, ग्रुप बी मध्ये असलेल्या मध्य प्रदेशचा सामना २८ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथील प्रसिद्ध ईडन गार्डन्स स्टेडियमवर बिहारशी झाला. या सामन्यात मध्य प्रदेशची सुरुवात खराब झाली होती, त्यांनी केवळ १०९ धावांवर आपला अर्धा संघ गमावला. या कठिण परिस्थितीत फलंदाजीसाठी आलेल्या व्यंकटेश अय्यरने डावाची सूत्रे केवळ सांभाळलीच नाहीत, तर जलद धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. त्याने केवळ ३४ चेंडूत नाबाद ५५ धावा केल्या. या शानदार खेळीदरम्यान, व्यंकटेशने १६१.७६ च्या प्रभावी स्ट्राईक रेटने फलंदाजी करत चार षटकार आणि एक चौकार मारला. त्याच्या योगदानामुळे मध्य प्रदेशने २० षटकांत ८ बाद १७४ धावांची मजल मारली.
व्यंकटेश अय्यरच्या दमदार खेळीनंतर, मध्य प्रदेशच्या गोलंदाजांनीही सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी बिहारच्या संघाला १९.२ षटकांत केवळ ११२ धावांवर गुंडाळले आणि ६२ धावांनी मोठा विजय नोंदवला. या सामन्यात बिहारकडून खेळणारा तरुण फलंदाज वैभव सूर्यवंशी ९ चेंडूत १३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मध्य प्रदेशकडून शिवांग कुमारने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तर, व्यंकटेश अय्यरने गोलंदाजीतही एक विकेट घेऊन आपल्या लिलावातील दावेदारीला अधिक बळकटी दिली.