गुजरातचा सलामीवीर आणि कर्णधार उर्विल पटेलने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ मध्ये पुन्हा एकदा आपल्या वादळी फलंदाजीने क्रिकेट जगताला चकित केले आहे. त्याने फक्त ३१ चेंडूत शतक ठोकून एक नवीन आणि अनोखा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. उर्विल पटेल आता टी-२० क्रिकेटमध्ये ३५ पेक्षा कमी चेंडूत दोनदा शतक करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी त्याने २०२४ मध्ये त्रिपुरा विरुद्धच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये फक्त २८ चेंडूत शतक झळकावले होते. आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आली नाही.
सर्व्हिसेस विरुद्धच्या सामन्यात उर्विल पटेलने सलामीला येत ३१ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने ११ चौकार आणि ८ षटकार मारले. सामन्यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट ३२२ पेक्षा जास्त होता. विशेष म्हणजे, टी-२० क्रिकेटमध्ये ३५ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत दोन वेळा शतक करणारा तो जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे. टी-२० क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा विक्रम सध्या साहिल चौहानच्या (२७ चेंडूत) नावावर आहे.
उर्विल पटेल गेल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जसाठी तीन सामने खेळले, पण त्याला विशेष मोठी खेळी करता आली नाही. त्याने तीन सामन्यात फक्त ६८ धावा केल्या. मात्र, सीएसकेने त्याला या हंगामातही संघात कायम ठेवले आहे. उर्विलकडे ५० टी-२० सामन्यांचा अनुभव आहे. तो जलद धावा करतो, पण बहुतेकदा लहान धावांवर बाद होतो. त्याला आयपीएलमध्ये आपला दावा मजबूत करण्यासाठी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उर्वरित सामन्यांमध्ये सातत्याने धावा करणे आवश्यक आहे.