Join us  

Team India Head Coach: सहा जणांमध्ये 'रेस'; पण रवी शास्त्रींची 'स्पेशल केस', कारण...

वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाच्या कामगिरीनंतर रवी शास्त्रींना 'नारळ' द्यावा, असं अनेकांचं ठाम मत होतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 12:18 PM

Open in App
ठळक मुद्देभारताच्या प्रशिक्षकपदी बहुधा शास्त्री गुरुजींचीच फेरनिवड होण्याची चिन्हं दिसताहेत.बीसीसीआयच्या छाननीनंतर सहा शिलेदार प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत उरलेत.कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील सीएसी हेड कोचची निवड करणार आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर, दोन व्यक्ती क्रिकेट चाहत्यांचं लक्ष्य ठरल्या होत्या. या दोघांना हटवण्याची जोरदार मोहीमच सोशल मीडियावर चालली होती. त्यापैकी एक होता कर्णधार विराट कोहली आणि दुसरी व्यक्ती होती टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री. संघ एकसंध बांधण्यात, चौथ्या क्रमांकाचा पेच सोडवण्यात आणि एकूणच निर्णयप्रक्रियेत ही जोडगोळी अपयशी ठरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. विराटकडून कर्णधारपद रोहित शर्माकडे द्यावं आणि रवी शास्त्रींनाही 'नारळ' द्यावा, असं अनेकांचं ठाम मत होतं. परंतु, विराटचं कर्णधारपद टिकून आहे आणि संघाच्या प्रशिक्षकपदीही बहुधा शास्त्री गुरुजींचीच फेरनिवड होण्याची चिन्हं दिसताहेत. कारण, प्रशिक्षकपदासाठी जे सहा शिलेदार मैदानात आहेत, त्यात रवी शास्त्रींचं पारडं जड वाटतंय.

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आज सकाळी साडे दहा वाजता मुलाखती सुरू झाल्यात. भारताला पहिला विश्वचषक जिंकवून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) हेड कोचची निवड करणार आहे. या समितीत अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांचाही समावेश आहे. बीसीसीआयच्या छाननीनंतर सहा शिलेदार प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत उरलेत. ते आहेत, टॉम मुडी, माईक हेसन, फिल सिमन्स, लालचंद राजपूत, रॉबिन सिंग आणि रवी शास्त्री. 

'हेड कोच' पदासाठी इच्छुक असलेल्या माजी क्रिकेटपटूंची कारकीर्द

रवी शास्त्री - ८० कसोटी, १५० वनडे (वय ५७ वर्षे)

टॉम मुडी - ८ कसोटी, ७६ वनडे (वय ५३ वर्षे)

माईक हेसन - खेळाडू म्हणून अनुभव नाही (वय ५६ वर्षे)

फिल सिमन्स - २६ कसोटी, १४३ वनडे (वय ५६ वर्षे)

लालचंद राजपूत - २ कसोटी, ४ वनडे (वय ५७ वर्षे)

रॉबिन सिंग - १ कसोटी, १३६ वनडे (वय ५५ वर्षे)

रवी शास्त्री, टॉम मुडी आणि फिल सिमन्स यांची मुलाखत स्काईपवरून घेतली जाणार आहे, तर उर्वरित तिघे जण प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित आहेत. 

सहा शिलेदारांची कारकीर्द पाहिल्यानंतर, टीम इंडियाचे हेड कोच म्हणून रवी शास्त्रीच प्रबळ दावेदार का आहेत, याची कल्पना येते. 

जुलै २०१७ मध्ये रवी शास्त्री यांच्याकडे दुसऱ्यांदा टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा देण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात टीम इंडिया २१ कसोटी सामने खेळली आणि त्यापैकी १३ सामने जिंकली. वनडे सामन्यांचा विचार केल्यास, शास्त्री गुरुजींच्या कार्यकाळात झालेल्या ६० सामन्यांपैकी ४३ सामन्यांत टीम इंडियाने विजय मिळवला. तसंच, टी-२० मध्येही ३६ पैकी २५ सामन्यांत भारताने विजयोत्सव साकारला. 

आज संध्याकाळी सात वाजता बीसीसीआय पत्रकार परिषदे घेणार असून भारताच्या नव्या प्रशिक्षकाचं नाव जाहीर केलं जाणार आहे. 

दरम्यान, टीम इंडियाला 'मिशन वर्ल्ड कप' फत्ते करता न आल्यानं रवी शास्त्री टीकेचे धनी ठरले होते. रवी शास्त्री आणि विराट कोहली हे दादागिरी करत असल्याचा ठपकाही ठेवण्यात आला होता आणि टीम इंडियात फूट पडल्याचीही चर्चा होती. परंतु, हाच संघ वेस्ट इंडिजमध्ये एकदिलाने खेळताना, चांगली कामगिरी करताना दिसतोय. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचा राग शांत झालाय. तेही शास्त्रींच्या पथ्यावर पडू शकतं.  

टॅग्स :रवी शास्त्रीभारतीय क्रिकेट संघविराट कोहलीवर्ल्ड कप 2019बीसीसीआय