मेलबोर्न : ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज पीटर सिडल याने रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ऑस्ट्रेलियाकडून ६७ कसोटी खेळणाऱ्या सिडलची मेलबोर्न येथील न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी संघात निवड झाली होती. मात्र अंतिम संघात त्याला संधी मिळाली नाही. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो स्थानिक स्पर्धांमध्ये खेळणार आहे.
सिडल म्हणाला, ‘आॅस्ट्रेलियाकडून खेळणे हे सन्मानाचे असते. मी जेंव्हा जेंव्हा मैदानावर असायचो तेव्हा मी खूपच नशीबवान असल्याचे मला जाणवत असे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील एका विशेष घटनेची निवड करणे कठीण आहे. मी जे काही खेळलो ते सर्वच विशेष होते.’
या वर्षी इंग्लंडमध्ये जाऊन आॅस्ट्रेलियाने अॅशेस आपल्याकडे राखण्यात यश मिळवले. यात सिडलचा वाटा मोठा होता. सिडलने ६७ कसोटीत २२१ बळी मिळवले. या दरम्यान त्याने एका डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याची किमया आठ वेळा केली. त्याने २० एकदिवसीय व दोन टी२० सामन्यातही आॅस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले.