Join us
Daily Top 2Weekly Top 5

गिल म्हणजे भावी गुंतवणूक, संघातील वाढते महत्व अधोरेखित...

गिलसाठी हा काळ खूप शानदार ठरत आहे. त्याला पहिल्यांदाच कसोटी कर्णधार बनविल्यानंतर भारताने इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सोडविली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 05:34 IST

Open in App

 - अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर

फलंदाज शुभमन गिलला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्माच्या जागी एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवणे म्हणजे भारतीय क्रिकेटमध्ये त्याचे वाढते महत्त्व अधोरेखित करणारे आहे. योगायोग असा की, शनिवारी त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिजचा अहमदाबाद कसोटीत अवघ्या अडीच दिवसांत पराभव केला. 

गिलसाठी हा काळ खूप शानदार ठरत आहे. त्याला पहिल्यांदाच कसोटी कर्णधार बनविल्यानंतर भारताने इंग्लंडमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सोडविली होती. त्या मालिकेत गिलने स्वतः ७५० हून अधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे निवड समितीने दूरदृष्टी ठेवून त्याला एकदिवसीय संघाची कमान सोपवली आहे. मुळात हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे. यामुळे गिलला दोन वर्षांनंतर होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी स्वतःला सिद्ध करण्याची आणि संघाची रणनीती आखण्याची पुरेशी संधी मिळेल. तसेच इतर खेळाडूंनाही नव्या कर्णधारासोबत जुळवून घेण्यासाठी वेळ मिळेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात घेताना रोहित आणि विराटला निवडकर्त्यांनी स्पष्ट संदेश दिला आहे की, जर या दोन्ही दिग्गजांची फॉर्म आणि फिटनेस चांगला ठेवला तरच ते २०२७ च्या वनडे विश्वचषकाची स्वप्ने पाहू शकतात.

रवींद्र जडेजाला सलामभारताच्या या विजयात खास करून रवींद्र जडेजाचा उल्लेख करणे आवश्यक आहे. त्याने दमदार कामगिरीने आपली जबाबदारी वाढवली आहे. जडेजा आता हळूहळू निवृत्तीकडे झुकत असला तरी, तो आपल्या उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरीसाठी ओळखला जावा, अशी त्याची इच्छा आहे. मोहम्मद सिराजची कामगिरीही उल्लेखनीय ठरली. त्याने सामन्यात एकूण सात बळी घेतले. त्याच्यामध्ये असलेली बळींची भूक स्पष्टपणे दिसली.

टीम इंडियाचा प्रभावी खेळवेस्ट इंडिजवर एक डाव आणि १४० धावांनी विजय मिळवणे फारसे आश्चर्यकारक नाही; कारण कॅरेबियन संघ कमकुवत आहे.पुढील कसोटी सामन्यातही त्यांची अहमदाबादसारखीच गत झाली तर नवल वाटायला नको. भारताने सांघिक खेळ करताना सर्वच विभागांत उत्कृष्ट कामगिरी केली. मात्र, यशस्वी जैस्वालसारख्या दमदार फलंदाजाने निराशा केली. शुभमन गिललाही त्याचे अर्धशतक शतकात रूपांतरित करण्यात अपयश आले.

यष्टिरक्षक ध्रुव जुरेलची कमाल

यष्टिरक्षक ध्रुव जुरेलने तर कमालच केली. अंतिम ११ मध्ये त्याचे स्थान निश्चित नव्हते; पण मिळालेल्या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. तसेही एक विशेषज्ञ फलंदाज म्हणून संघात खेळण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. पंतसाठी तो एक तोडीस तोड पर्याय ठरला आहे.

टॅग्स :शुभमन गिल