भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे सुरू झाला. वेस्ट इंडिजचा कर्णधार रोस्टन चेसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या नाणेफेकीमुळे भारतीय कर्णधार शुबमन गिलच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.
शुबमन गिल आता त्याच्या कारकिर्दीतील सलग सहाव्या कसोटी सामन्यात टॉस गमावणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. यापूर्वी हा 'नकोसा' विक्रम भारताचा महान अष्टपैलू कपिल देव यांच्या नावावर होता. कपिल देव यांनी १९८३ मध्ये त्यांच्या कर्णधारपदाच्या सुरुवातीला सलग पाच कसोटी सामन्यांमध्ये टॉस गमावला होता. गिलने हा विक्रम मोडत, न्यूझीलंडच्या टॉम लॅथमची बरोबरी केली, ज्यांनी त्यांच्या पहिल्या सहा कसोटी सामन्यांमध्ये टॉस गमावला.
गिलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पुढील दोन कसोटी सामन्यांमध्येही नाणेफेक गमावली, तर तो कर्णधारपदाच्या कारकिर्दीतील सर्वाधिक आठ कसोटी सामन्यांमध्ये टॉस गमावणारा पहिला कर्णधार बनेल. सध्या हा विक्रम न्यूझीलंडच्या बेवन काँगडॉन यांच्या नावावर आहे, ज्यांनी त्यांच्या पहिल्या सात कसोटी सामन्यांमध्ये टॉस गमावला आहे.
भारतीय संघ दोन वेगवान गोलंदाज आणि तीन फिरकी गोलंदाजांच्या संयोजनासह मैदानात उतरला आहे. नितीश कुमार रेड्डी संघात परतला आहे. तर, वेस्ट इंडिज संघ दोन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांच्या संयोजनासह खेळत आहे.
भारताची प्लेईंग इलेव्हन:
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
वेस्ट इंडीजची प्लेईंग इलेव्हन:
तेगनारायण चंद्रपॉल, जॉन कॅम्पबेल, अॅलिक अथानाझे, ब्रँडन किंग, शाई होप (यष्टीरक्षक), रोस्टन चेस (कर्णधार), जस्टिन ग्रीव्हज, जोमेल वॉरिकन, खॅरी पियरे, जोहान लायन आणि जेडेन सील्स.