बेंगळुरू : श्रेयस गोपालच्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे सौराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यादरम्यान खेळल्या जात असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्य फेरीची लढत रंगतदार स्थितीत आली आहे. त्यात उभय संघांना सरशी साधण्याची संधी आहे.
सौराष्ट्रचा डाव २३६ धावांत गुंडाळल्यानंतर कर्नाटकने दुसऱ्या डावात तिसºया दिवसअखेर ८ बाद २३७ धावांची मजल मारली होती. कर्नाटक संघाकडे एकूण २७६ धावांची आघाडी असून त्यांच्या दोन विकेट शिल्लक आहेत. गोपाल व अभिमन्यू मिथुन (३५) यांनी नवव्या विकेटसाठी ६१ धावांची अभेद्य भागीदारी केली होती. वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट व डावखुरा फिरकीपटू धर्मेंद्रसिंग जडेजा यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. सामन्यात अद्याप दोन दिवसांचा खेळ शिल्लक असून सौराष्ट्र संघात चेतेश्वर पुजारासारखा दिग्गज खेळाडू आहे. त्यामुळे ३०० च्या आसपासचे लक्ष्य कठिण भासायला नको. उपांत्यपूर्व फेरीत सौराष्ट्रने उत्तर प्रदेशविरुद्ध ३७२ धावांचे लक्ष्य गाठले होते. स्पर्धेच्या इतिहासाचा विचार करता लक्ष्याचा पाठलाग करताना हा सर्वांत मोठा विजय ठरला.
सौराष्ट्रने कालच्या धावसंख्येत ९ धावांची भर घालताना धर्मेंद्रसिंग जडेजा (३), जयदेव उनाडकट (०) आणि अर्पित वासवडा (३०) यांच्या विकेट गमावल्या. रोनित मोरेने ६० धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले. कर्नाटकच्या दुसºया डावाची सुरुवात निराशाजनक ठरली. उनाडकटने तिसऱ्याच षटकात रविकुमार समर्थ (५) याला तंबूचा मार्ग दाखविला. प्रेरक मांकडने कृष्णमूर्ती सिद्धार्थ (८) आणि करुण नायर यांना बाद केले. एका टोकाकडून मयंक अग्रवालने संयमी फलंदाजी केली, पण दुसऱ्या टोकाकडून मनीष पांडे (२६) याला धर्मेंद्रसिंग जडेजाने तंबूचा मार्ग दाखविला. अग्रवालने ७७ चेंडूंना सामोरे जाताना ४६ धावा केल्या. गोपालने १३४ चेंडूंमध्ये दोन षटकार व चार चौकारांच्या साहाय्याने ६० धावा केल्या. मिथुनने ८७ चेंडूंमध्ये ३५ धावांची खेळी केली. (वृत्तसंस्था)