वेस्ट इंडिज क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे... २०१६च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघातील चार खेळाडूंना तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. क्रिकेट बेस्ट इंडिजने ( CWI) दिलेल्या वृत्तानुसार अनिसा मोहम्मद, साकेरा सेलमन, किसीया नाइट आणि श्योना नाइट यांनी निवृत्ती जाहीर केली आहे. भारतात २०१६मध्ये झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघात या चौघिंचा मोठा वाटा होता.
फिरकीपटू अनिसाने २००३ मध्ये १५ वर्षांची असताना वेस्ट इंडिजच्या राष्ट्रीय संघातून पदार्पण केले आणि ती संघाची महत्त्वाची खेळाडू बनली. तिने १४१ वन डे व ११७ ट्वेंटी-२० सामन्यांत मिळून ३०५ विकेट्स घेतल्या. २०१६ तिने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त १०० विकेट्स घेणाऱ्या पहिल्या ( पुरुष किंवा महिला) खेळाडूचा मान पटकावला. सेलमनने २००८मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि तिने वन डे व ट्वेंटी-२० अशा एकूण १९६ सामन्यांत १३३ विकेट्स घेतल्या आहेत.
किसीया आणि श्योना यांनी अनुक्रमे २०११ आणि २०१३ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यष्टिरक्षक किसीयाने अनेक विक्रम नावावर केले आहेत. एकाच डावात सर्वाधिक बळी व स्टम्पिंगच्या विक्रमासह सर्वाधिक झेलचा विक्रम तिच्या नावावर आहे. तिने १५७ सामन्यांत २१२८ धावा केल्या आहेत. श्योनाने १०६ सामन्यांत १३९७ धावा केल्या आहेत. या चौघींच्या निवृत्तीमुळे वेस्ट इंडिज महिला क्रिकेटचा एक पर्व संपले.