मुंबई: टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या विजयाचा जल्लोष देशभरात सुरू असताना, टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू शिवम दुबे याने सर्वांच्या नजरा टाळून एक असा प्रवास केला, ज्याची कोणाही कल्पना केली नव्हती. क्रिकेटचा स्टारडम, त्यात वर्ल्डकप जिंकून मुंबईला यायचे होते. पत्नी, मुले सोबत होती. खेळाडू चक्क रेल्वेच्या 'थर्ड एसी' डब्यातून प्रवास करत आपल्या घरी पोहोचला. विशेष म्हणजे, या ८ तासांच्या प्रवासात कोणालाही शंका येऊ नये म्हणून त्याने आणि त्याच्या पत्नीने एक भन्नाट युक्ती वापरली.
जेव्हा टीटीई समोर आला...
शिवमने या प्रवासातील एक रंजक किस्सा सांगितला. जेव्हा Ahmedabad–Mumbai Sayaji Express ट्रेनमध्ये तिकीट तपासणीसाठी टीटीई आला, तेव्हा त्याने शिवमचे नाव वाचून विचारले, "कोण शिवम दुबे? तोच का क्रिकेटर?" त्या क्षणी आपली ओळख पकडली जाते की काय असे वाटले होते.पण शिवमची पत्नी अंजुमने प्रसंगावधान राखत उत्तर दिले, "नाही, नाही... तो इथे कसा काय येईल?" अंजुमच्या या उत्तरामुळे टीटीईचा संभ्रम दूर झाला आणि तो पुढे निघून गेला.
वरच्या बर्थवर लपून ८ तासांचा प्रवास
ओळख पटू नये म्हणून शिवम दुबेने संपूर्ण प्रवासाचा प्लॅन आधीच तयार केला होता. ट्रेन सुटण्यापूर्वी ५ मिनिटांपर्यंत तो कारमध्येच बसून राहिला होता. ट्रेनमध्ये चढताच तो थेट वरच्या बर्थवर जाऊन झोपला. रात्रीच्या वेळी वॉशरूमला जातानाही त्याने कमालीची खबरदारी घेतली. शिवम म्हणतो, "मला भीती होती की कोणीतरी मला ओळखेल, पण नशिबाने संपूर्ण ८ तासांचा प्रवास अत्यंत सुलभ झाला. कोणालाही मी तिथे असल्याची कल्पना आली नाही."
शेवटी पोलिसांची मदत घ्यावी लागली!
ट्रेनचा प्रवास सुखरूप झाला असला तरी, बोरिवली स्टेशनवर उतरताना गर्दीत अडकण्याची भीती शिवमला होती. त्याने आधीच पोलिसांशी संपर्क साधला होता. जेव्हा त्याने पोलिसांना सांगितले की तो विमानतळावरून नाही तर ट्रेनने येत आहे, तेव्हा पोलीसही चकित झाले. अखेर पोलिसांनी त्याला सुरक्षा कवच दिले आणि तो सुखरूप स्टेशनच्या बाहेर पडू शकला. याबाबतचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.