ग्लोबल सुपर लीगमधील नवव्या सामन्यात गयाना अमेझॉन वॉरियर्सने होबार्ट हरिकेन्सविरुद्ध चार विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या गुडाकेश मोतीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. परंतु, सर्वत्र गयाना अमेझॉन वॉरियर्सचा तडाखेबाज फलंदाज शिमरोन हेटमायरच्या वादळी खेळीची चर्चा होत आहे. हेटमायरने एका षटकात पाच षटकार ठोकून संघाच्या विजयाचा पाया रचला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या होबार्ड हरिकेन्स खराब कामगिरी केली. होबार्ड हरिकेन्सचा संघ १६.१ षटकात १२५ धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात गयाना अमेझॉन वॉरियर्सने १६.३ षटकात ६ विकेट्स राखून सामना जिंकला.
गयाना अमेझॉन वॉरियर्सच्या डावातील दहाव्या षटकात होबार्ट हरिकेन्सकडून फॅबियन एलेन गोलंदाजीसाठी आला. या षटकातील पहिल्या चेंडूवर हेटमायरने षटकार मारला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सीमारेषेजवळ थांबलेल्या ओडीन स्मिथने त्याचा झेल सोडला आणि हा चेंडूही सीमारेषेपलिकडे गेला. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरही त्याने षटकार मारला. पुढे पाचव्या चेंडूवर त्याने दोन धावा घेतल्या आणि अखेरच्या चेंडूवर षटकार मारला. अशा पद्धतीने त्याने एका षटकात पाच षटकार ठोकून संघाच्या विजयाचा पाया रचला.
होबार्ट हरिकेन्सची खराब फलंदाजीया सामन्यात नाणेफेक जिंकून होबार्ट हरिकेन्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु संघाची सुरुवात खूपच खराब झाली. सलामीवीर भानुका राजपक्षे दुसऱ्या षटकात १ धावा काढून बाद झाला. त्यानंतर जेक डोरन खाते न उघडताच पव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार बेन मॅकडर्मॉट देखील ९ चेंडूत २१ धावा काढून माघारी गेला. मॅकअॅलिस्टर राईट आणि निखिल चौधरी यांनी काही काळ जबाबदारी सांभाळली आणि संघाची धावसंख्या ६५ पर्यंत पोहोचवली. परंतु, निखिल बाद झाल्यानंतर ३७ धावांची भागीदारी संपुष्टात आली. त्याने १४ चेंडूत २१ धावा केल्या. मॅकअॅलिस्टरही १५ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. मोहम्मद नबीने २२ चेंडूत २१ धावा आणि फॅबियन अॅलनने २० चेंडूत २८ धावा केल्या. होबार्ड हरिकेन्सच्या संघाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या आणि संघ १७व्या षटकात सर्वबाद झाला.
गयाना अमेझॉन वॉरियर्सचा चार विकेट्सने विजयलक्ष्याचा पाठलाग करताना गयाना अमेझॉन वॉरियर्सची सुरुवात खराब झाली. जॉन्सन चार्ल्स पहिल्याच षटकात ८ धावा काढून बाद झाला. त्यानंतर रहमानउल्लाह गुरबाजही ७ धावा काढून चौथ्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला. एविन लुईसनेही निराशा केली आणि तो फक्त ७ धावा करू शकला. पण त्यानंतर शिमरॉन हेटमायरने कहर केला आणि फक्त १० चेंडूत सहा षटकारांच्या मदतीने ३९ धावा केल्या. गुडाकेश मोतीने १३ धावांचे योगदान दिले. मोईन अलीने नाबाद ३० आणि रोमारियो शेफर्डने नाबाद ६ धावा करून संघाला विजय मिळवून दिला. होबार्ट हरिकेन्सकडून बिली स्टॅनलेकने सर्वाधिक तीन विकेट्स घेतले.