Join us  

शिखर धवनची दुखापत गंभीर, प्रदीर्घ कालावधीपर्यंत राहणार क्रिकेटपासून दूर

भारतीय संघ नववर्षातील पहिल्या परदेश दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी शिखर धवनला दुखापत झाली. धवननं न्यूझीलंड दौऱ्यातून माघार घेतली. दुखापतीतून सावरतच ...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 9:54 AM

Open in App

भारतीय संघ नववर्षातील पहिल्या परदेश दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी शिखर धवनला दुखापत झाली. धवननं न्यूझीलंड दौऱ्यातून माघार घेतली. दुखापतीतून सावरतच धवननं श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतून टीम इंडियात कमबॅक केले होते, परंतु ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला संपूर्ण न्यूझीलंड दौऱ्यातूनच माघार घ्यावी लागली. धवनची माघार यापेक्षा त्याची दुखापत ही टीम व्यवस्थापनाच्या चिंतेचा विषय बनला आहे. या दुखापतीमुळे दिल्लीच्या फलंदाजाला प्रदीर्घ काळ क्रिकेटपासून दूर रहावे लागणार असल्याची वृत्त समोर येत आहे.

India vs New Zealand : न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचा वन डे संघ जाहीर, युवा खेळाडूला पदार्पणाची संधी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या वन डे सामन्यात धवनला दुखापत झाली होती. त्यात तिसऱ्या सामन्यात अधिक भर पडली आणि त्यानं मैदान सोडलं होतं. त्यानंतर तो फलंदाजीलाही आला नाही. त्याच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी ओपनिंग केली होती. त्यामुळे धवनच्या न्यूझीलंड दौऱ्यावरही साशंकता होती. अखेर धवनला किवी दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी ट्वेंटी-20 संघात संजू सॅमसन खेळणार आहे. टाईम्स नाऊ या इंग्रजी वेबसाईटनं दिलेल्या वृत्तानुसार धवनला जवळपास 10 आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. धवन सध्या बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचारासाठी दाखल होणार आहे. 

विराट-रोहित न्यूझीलंडमध्ये छाप पाडतील

बीसीसीआयनं धवनच्या दुखापतीबाबत सांगितले की,''धवनच्या खांद्याचा MRI काढण्यात आला आणि त्याची ही दुखापत ग्रेड दोनची असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याला विश्रांतीला सल्ला देण्यात आला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचारासाठी  दाखल होईल.'' धनवनं न्यूझीलंड दौऱ्यातून माघार घेतल्यामुळे ट्वेंटी-20 संघात संजू सॅमसन, तर वन डे संघात पृथ्वी शॉ यांना संधी मिळाली आहे.  

दरम्यान, टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज इशांत शर्मा यालाही रणजी करंडक स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे त्यालाही न्यूझीलंड दौऱ्यातील कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. ''MRI रिपोर्टमध्ये इशांत शर्माची दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याचे आढळले आहे. त्यालाही सहा आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे,''असे दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सरचिटणीस विनोद तिहारा यांनी सांगितले. टीम इंडियाच्या कसोटी संघात इशांतच्या जागी नवदीप सैनीला संधी मिळू शकते. 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडशिखर धवनइशांत शर्माबीसीसीआय