India vs New Zealand : BCCI announced ODI Team for New Zealand Tour, prithvi shaw gets maiden call up | India vs New Zealand : न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचा वन डे संघ जाहीर, युवा खेळाडूला पदार्पणाची संधी

India vs New Zealand : न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाचा वन डे संघ जाहीर, युवा खेळाडूला पदार्पणाची संधी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) मंगळवारी न्यूझीलंड दौऱ्याकरीता वन डे संघाची घोषणा केली. शिखर धवननं दुखापतीमुळे माघार घेतल्यानंतर त्याच्या जागी कोणाला संधी मिळेल, याची सर्वांना उत्सुकता होती. बीसीसीआयनं धवनच्या जागी ट्वेंटी-20 मालिकेत संजू सॅमसनला संधी दिली आहे. संजू सध्या भारत अ संघाबरोबर न्यूझीलंड दौऱ्यावरच आहे. पाच ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिका या दौऱ्यावर खेळल्या जाणार आहेत. यापैकी ट्वेंटी-20 मालिकेसाठी बीसीसीआयनं संघ आधीच जाहीर केला होता, परंतु मंगळवारी वन डे संघही जाहीर केला. धवननं माघार घेतल्यामुळे वन डे मालिकेत एक युवा फलंदाज पदार्पणासाठी सज्ज झाला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या वन डे सामन्यात धवनला दुखापत झाली होती. त्यात तिसऱ्या सामन्यात अधिक भर पडली आणि त्यानं मैदान सोडलं होतं. त्यानंतर तो फलंदाजीलाही आला नाही. त्याच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी ओपनिंग केली होती. त्यामुळे धवनच्या न्यूझीलंड दौऱ्यावरही साशंकता होती. अखेर धवनला किवी दौऱ्यातून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी ट्वेंटी-20 संघात संजू सॅमसन खेळणार आहे.

बीसीसीआयनं तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी जाहीर केलेल्या टीम इंडियात पृथ्वी शॉला संधी देण्यात आली आहे. धवनच्या माघारीमुळे पृथ्वीला वन डे पदार्पणाची संधी मिळाली आहे. भारताच्या वन डे संघात मुंबईचे पाच खेळाडूंचा समावेश आहे. रोहित, पृथ्वी, शिवम, श्रेयस आणि शार्दूल असे पाच मुंबईकर टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

भारताचा वन डे संघ - विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा ( उपकर्णधार), पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत ( यष्टिरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, केदार जाधव.

वन डे 
भारत विरुद्ध न्यूझीलंड - 5 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वा.
भारत विरुद्ध न्यूझीलंड - 8 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वा.
भारत विरुद्ध न्यूझीलंड - 11 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वा.

Web Title: India vs New Zealand : BCCI announced ODI Team for New Zealand Tour, prithvi shaw gets maiden call up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.