Join us
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या फॉर्मनंतरही शिखर धवनला मिळणार डच्चू? या खेळाडूला मिळणार संधी?

आशिया चषक स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठीच्या संघात स्थान मिळवण्यासाठी कर्णधार विराट कोहली यालाही यो-यो टेस्ट द्यावी लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 12:29 IST

Open in App

मुंबई : आशिया चषक स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठीच्या संघात स्थान मिळवण्यासाठी कर्णधार विराट कोहली यालाही यो-यो टेस्ट द्यावी लागणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करणार आहे. या मालिकेत धक्कादायक बदल पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इंग्लंड दौऱ्यातील अपयशानंतर सलामीवीर शिखर धवनला या कसोटी संघातून डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच्या जागी मुंबईचा पृथ्वी शॉला संधी मिळणार असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.

या मालिकेसाठीचा संघ 25 सप्टेंबरला निवडण्यात येणार होता. मात्र इशांत शर्मा आणि आर अश्विन यांच्या फिटनेस टेस्ट अहवालासाठी ही निवड पुढे ढकलण्यात आली आहे. हे दोघेही शनिवारी यो-यो टेस्ट देणार आहेत. अश्विनला इंग्लंड दौऱ्यातील तिसऱ्या कसोटीत दुखापत झाली होती. इशांतलाही दुसऱ्या कसोटीत दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावे लागले होते. त्यामुळे त्यांना यो-यो टेस्ट द्यावी लागणार आहे. आशिया चषक स्पर्धेत धवन खोऱ्याने धावा करत असला तरी त्याला कसोटी संघातून वगळण्यात येणार असल्याचा दावा वृत्तपत्राने केला आहे.

वेस्ट इंडीजचा संघ शनिवारी बोर्ड एकादश संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. यात मयांक अग्रवाल, पृथ्वी आणि हनुमा विहारी हे खेळणार आहेत. त्यामुळे या तिघांना राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याची संधी आहे. धवनला डच्चू मिळाल्यास लोकेश राहुल आणि पृथ्वी यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे सराव सामन्यात पृथ्वीच्या कामगिरीवर लक्ष असेल. त्यातच मुरली विजय आणि रोहित शर्मा यांना संधी मिळेल का, याचीही उत्सुकता आहे. 

टॅग्स :भारत आणि वेस्ट इंडिजशिखर धवनपृथ्वी शॉ