मेलबोर्न : युवा फलंदाज शेफाली वर्मा हिला संघ व्यवस्थापनाने नैसर्गिक फटकेबाजीची पूर्णपणे मोकळीक दिली असल्याचे भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने शनिवारी सांगितले. १६ वर्षांच्या शेफालीने टी-२० महिला विश्वचषकात आतापर्यंत शानदार कामगिरी केली असून, १८ चौकार आणि ९ षट्कारांसह चार सामन्यात १६१ धावा ठोकल्या. सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ती दुसºया स्थानावर आहे.
शेफालीने लंकेविरुद्ध ३४ चेंडूत ४७ धावा फटकवून संघाला ७ गड्यांनी विजय मिळवून दिला. सामना संपल्यानंतर हरमनप्रीत म्हणाली, ‘शेफालीला मोठे फटके मारणे आवडते. आम्ही तिला मुळीच रोखणार नाही. तिने पुढील सामन्यातही असाच नैसर्गिक खेळ करावा.’ भारताने चार सामने जिंकले असून, उपांत्य फेरी गाठली. यावर कर्णधार म्हणाली, ‘विजयी वाटचाल सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे. विजय मिळत राहिले तर लय कायम राहते. कठोर मेहनतीच्या बळावर विजय साजरे होतात. त्यामुळे लय स्थगित होईल, अशी कुठलीही जोखीम पत्करणार नाही.’ (वृत्तसंस्था)