Join us  

शशांक मनोहर यांनी आयसीसीचं पद सोडले; इम्रान ख्वाजा बनले हंगामी चेअरमन

आयसीसी चेअरमन मनोहर यांनी दोन वर्षांचे दोन कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पद सोडले. त्यानंतर आयसीसी बोर्डाची आजच बैठक झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 12:09 AM

Open in App

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) पहिले स्वतंत्र चेअरमन राहिलेले अ‍ॅड. शशांक मनोहर यांचा कार्यकाळ बुधवारी संपला. आयसीसीच्या प्रसिद्धिपत्रकानुसार उपचेअरमन इम्रान ख्वाजा यांच्याकडे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हंगामी चेअरमनपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

आयसीसी चेअरमन मनोहर यांनी दोन वर्षांचे दोन कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पद सोडले. त्यानंतर आयसीसी बोर्डाची आजच बैठक झाली. त्यात इम्रान ख्वाजा यांच्याकडे भावी चेअरमनची निवड होईपर्यंत हंगामी चेअरमनपदाचा कार्यभार सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला.आयसीसीच्या नियमानुसार मनोहर हे आणखी दोन वर्षे तिसऱ्या टर्मसाठी पदावर राहू शकले असते. एका व्यक्तीला तीन टर्म पदावर राहण्याची मोकळीक आहे. आयसीसी बोर्ड पुढील आठवड्यात चेअरमनपदाच्या निवडणूक प्रक्रियेला मान्यता देण्याची अपेक्षा आहे. 

  • ज्येष्ठ विधिज्ञ असलेले ६२ वर्षांचे शशांक मनोहर यांनी नोव्हेंबर २०१५ ला आयसीसी चेअरमनपद सांभाळले होते. त्याआधी ते २००८ ते २०११ या कालावधीत बीसीसीआय अध्यक्ष होते.
  • आयसीसीचे सीईओ मनू साहनी यांनी मनोहर यांची नेतृत्वक्षमता तसेच आयसीसी चेअरमन या नात्याने त्यांनी खेळाच्या प्रगतीसाठी केलेल्या कामाचा गौरव केला आणि त्यांचे आभार मानले.
  • ख्वाजा यांनी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष राहिलेले मनोहर यांनी या खेळाला ग्लॅमर आणून आर्थिकदृष्ट्या भक्कम केल्याचे सांगितले. ‘मनोहर यांनी खेळासाठी जे केले त्यासाठी आयसीसी त्यांच्या ऋणात असेल. आयसीसी आणि क्रिकेटला मनोहर यांनी ज्यावेळी सांभाळले त्यातुलनेत आज अत्यंत उत्कृष्ट स्थितीत आणून ठेवले आहे,’ या शब्दात ख्वाजा यांनी मनोहर यांचा गौरव केला.
टॅग्स :आयसीसी