देशांतर्गत क्रिकेटमधील रणजी करंडक स्पर्धेच्या सातव्या आणि अखेरच्या फेरीत मुंबई आणि मेघालय यांच्यातील लढत शरद पवार क्रिकेट अकादमी बीकेसीच्या मैदानात रंगली आहे. या सामन्यात शार्दुल ठाकूरसहमुंबईच्या ताफ्यातील अन्य गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर मेघालयची अवस्था बिकट झाली. नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा बॅटिंगसाठी मैदानात उतरलेला मेघालय संघ अवघ्या ८६ धावांत आटोपला. या सामन्यात रणजी स्पर्धेतील ९१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कमी धावांत अर्धा संघ तंबूत परतल्याचे पाहायला मिळाले. एका बाजूला मुंबईकरांनी गोलंदाजीत कमाल केली अन् दुसऱ्या बाजूला मेघालय संघावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबईकरांनी २ धावांत मेघालयच्या ६ गड्यांना दाखवला तंबूचा रस्ता
मुंबईच्या संघानं पहिल्या डावात मेघालयची अवस्था अतिशय बिकट केली. शार्दुल ठाकूरची हॅटट्रिक अन् दुसऱ्या बाजूनं अन्य गोलंदाजांचा अचू मारा यामुळे मेघालयच्या संघानं मुंबई विरुद्धच्या लढतीतील पहिल्या डावात अवघ्या २ धावांत ६ विकेट्स गमावल्याचे पाहायला मिळाले.
९१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या ९१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या कमी धावसंख्येवर ६ विकेट्स पडल्याचा रेकॉर्ड नोंदवला गेला. वर्ल्ड क्रिकेटमध्ये मेघालय अशी लाजिरवाणी कामगिरी नोंदवणाऱ्या संघाच्या यादी दुसऱ्या क्रमांकावर आहे. बीकेसीतील शरद पवार क्रिकेट अकादमी ग्राउंडवर रंगलेल्या सामन्यात शार्दुल ठाकूरनं हॅटट्रिक करताना चार विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. दुसऱ्या बाजूला मोहित अवस्थीनं मेघालयच्या संघाला दोन धक्के दिले. परिणामी संघाची अवस्था ६ बाद २ धावा अशी झाल्याचे पाहायला मिळाली. सर्वात कमी धावसंख्येत ६ विकेट्स गमावणाऱ्या संघांचा रेकॉर्ड
१८७२ मध्ये एमसीसी संघानं सरे विरुद्धच्या लढतीत शून्यावर ६ विकेट्स गमावल्याचा रेकॉर्ड आहे. या बिकट अवस्थेनंतर एमसीीचा संघ १६ धावांत ऑलआउट झाला होता. मेघालयचा संघ या यादीत आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई विरुद्धच्या लढतीत मेघालयच्या संघाने २ धावांत ६ विकेट्स गमावल्यावर ८६ धावांपर्यंत मजल मारली. १८६७ मध्ये ऑक्सफर्ड युनिवर्सिटी संघानं एमसीसी संघाविरुद्धच्या सामन्यात ३ धावांत ६ विकेट्स गमावल्यावर ३२ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. याशिवाय लीसेस्टरशायर (१८९९), नॉर्थम्पटनशायर (१९०७), दिल्ली (१९३८-३९) आणि केरळ (१९६३-६४) या संघांनी ४ धावांत ६ विकेट्स गमावल्याचा रेकॉर्ड आहे.