आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात मोठा बदल करण्यात आला. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आणि आयपीएलचा दिग्गज खेळाडू शेन वॉटसन याच्यावर संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे आयपीएलच्या यंदाच्या हंगामात शेन वॉटसन नव्या जर्सीत दिसणार आहे.
शेन वॉटसनची गणना आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते. त्याचा आयपीएलमधील रेकॉर्ड खूप प्रभावी आहे.२००८ मध्ये राजस्थान रॉयल्सला पहिले आयपीएल जेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि त्याला 'मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर' म्हणून गौरवण्यात आले. त्यानंतर २०१३ मध्येही त्याने मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा किताब जिंकला होता. शिवाय, २०१९ मध्ये चेन्नई सुपर किंग्जला आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात त्याचे मोठे योगदान होते.या कामगिरीमुळे तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली परदेशी खेळाडूंपैकी एक मानला जातो. त्याने एकूण १२ आयपीएल हंगाम खेळले आहेत.
केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर यांनी वॉटसन संघात सामील झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, "शेन वॉटसनचे केकेआर कुटुंबात स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत. सर्वोच्च स्तरावर खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून त्यांचा अनुभव आमच्या संघाच्या तयारीमध्ये मोलाची भर घालेल."
आपल्या नवीन जबाबदारीबद्दल बोलताना शेन वॉटसन म्हणाला की, "कोलकाता नाईट रायडर्ससारख्या प्रतिष्ठित फ्रँचायझीचा भाग असणे माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. कोलकात्यासाठी आणखी एक विजेतेपद जिंकण्यासाठी मी कोचिंग ग्रुप आणि खेळाडूंसोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहे." शेन वॉटसनच्या अनुभवामुळे केकेआरच्या खेळाडूंना आणि विशेषतः युवा अष्टपैलू खेळाडूंना नक्कीच फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.