Join us  

Shane Warne Death, Sachin Tendulkar Emotional Tweet: शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर सचिन तेंडुलकरचं भावनिक ट्वीट; 'त्या' ३ शब्दांनी केली शोकसंदेशाची सुरूवात

वॉर्न आणि सचिन मैदानात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असले तरी मैदानाबाहेर खूप चांगले मित्र होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 9:14 PM

Open in App

Shane Warne Death, Sachin Tendulkar Emotional Tweet : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचं वयाच्या ५२व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तो थायलंडमध्ये होता. त्यावेळी त्याच्या विलामध्ये ही घटना घडली. त्याला हार्ट अँटक आल्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले पण त्या उपचारांना त्याने प्रतिसाद दिला नाही, असं त्याच्या मीडिया टीमने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं. शेन वॉर्नच्या अकाली निधनामुळे क्रिकेटविश्वाला मोठा धक्का बसला. शेन वॉर्न आणि सचिन तेंडुलकर हे दोघे मैदानात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असले तरी मैदानाबाहेर खूप चांगले मित्र होते. त्यामुळे सचिनने अतिशय भावनिक संदेश लिहिला.

सचिन तेंडुलकर आणि शेन वॉर्न हे दोघेही आपापल्या क्षेत्रातील दिग्गज. सचिन फलंदाजीत अव्वल तर शेन वॉर्न फिरकीचा जादुगार... त्यांच्या दोघांमध्ये असलेली स्पर्धा क्रिकेटरसिकांना कायमच हवीहवीशी वाटली. हे दोघे मैदानात शत्रू असले तरी बाहेर एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. त्यामुळे शेन वॉर्नचं निधन झाल्यानंतर सचिनने एक भावनिक संदेश लिहीला. तीन शब्दांनी त्याने शोकसंदेशाची सुरूवात केली. "धक्कादायक, स्तब्ध करणारी आणि मन सुन्न करणारी (बातमी)… वॉर्नी तुझी आठवण येईल. तू आजूबाजूला असताना मैदानावर किंवा मैदानाबाहेर कधीही कंटाळा आला नाही. तुझा खेळकर स्वभाव खूपच मस्त होता. मैदानावर असताना आपल्यातील झुंज आणि मैदानाबाहेरची आपली मैत्रिपूर्ण भांडणं कायम स्मरणात राहतील. भारतासाठी आणि भारतीयांच्या मनात तुझं नेहमीच एक खास स्थान होतं. तू फार लवकर आमच्यातून निघून गेलास", असं ट्वीट सचिनने केलं.

दरम्यान, सचिनने शेन वॉर्नची फिरकी चांगलीच धुवून काढली होती. एका मुलाखतीत बोलताना, सचिनची फटकेबाजी माझ्या स्वप्नात येते असंही वॉर्नने सांगितलं होतं. पण निवृत्तीनंतर सचिन आणि वॉर्न दोघेही अनेकदा समोरासमोर आले. तेव्हा ते दोघेही चांगले मित्र असल्याचं स्पष्ट दिसलं.

टॅग्स :शेन वॉर्नसचिन तेंडुलकर
Open in App