बांगलादेशचा स्टार ऑलराउंडर शाकिब अल हसन याच्या अडचणी कमी होण्याचे काही नाव दिसत नाही. एका बाजूला गोलंदाजी शैलीवर आक्षेपामुळे क्रिकटच्या मैदानात गोत्यात सापडलेला हा क्रिकेटपटूवर आता अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. बांगलादेशात त्याच्या विरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. शाकिब अल हसन कोट्यवधी रुपयांच्या चेक बाउंस प्रकरणात फसला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
क्रिकबझच्या वृत्तानुसार, शाकिबवर मागील वर्षी १५ डिसेंबरला चेक बाउंस प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात १८ डिसेंबरला न्यायालयीन सुनावणी झाली. यात १९ डिसेंबरला त्याला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. हे सर्व प्रकरण बांगलादेशमधील आयएफआयसी बँकेशी संबंधित आहे. बँक रिलेशनशिप ऑफिसर शाहिबुर रहमान यांनी बँकेच्या वतीने क्रिकेट विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
२ कोटींहून अधिक रक्कमेचे २ चेक बाउन्स झाल्यामुळे गोत्यात आलाय क्रिकेटर
या प्रकरणात शाकिबशिवाय ३ अन्य लोकांचाही समावेश आहे. शाकिब अल हसनच्या कंपनीनं दोन वेगवेगळ्या धनादेशाच्या माध्यमातून २ कोटी ९५ लाख रुपयांचे देय रक्कमेचा चेक बाउन्स झाला आहे. चेक बाउन्स होणं हा एक गुन्हा असून या प्रकरणी आता क्रिकेटरविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
आधी क्रिकेटच्या मैदानातून ओढावली ही नामुष्की
हे प्रकरण समोर येण्याआधी शाकिब अल हसन त्याच्या बॉलिंग शैलीमुळे अडचणीत आला होता. गतवर्षी सप्टेंबरमध्ये काउंटी क्रिकेटमध्ये संशयास्पद गोलंदाजी शैलीमुळे इंग्लंड क्रिकेटने त्याच्यावर बंदीची कारवाई केली. गोलंदाजी शैलीच्या आरोपातून सुटका करण्यासाठी क्रिकेटरनं दोन वेळा टेस्ट दिली. पण तो यातही फेल ठरला. त्याच्यावरील ही बंदी बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही कायम ठेवली असून त्यामुळे तो चॅम्पियन्स ट्रॉफीलाही मुकणार आहे. बांगलादेशचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताविरुद्ध सलामीची सामना खेळणार आहे.
टी-२० अन् कसोटीतून आधीच घेतलीये निवृत्ती
३७ वर्षीय शाकिब अल हसन याने टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. गोलंदाजीतील आक्षेपार्ह शैलीमुळे वनडे संघातूनही तो बाहेर पडलाय. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतरच शाकिबनं छोट्या फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मैदानातील कसोटी सामन्यातून त्याला रेड बॉल क्रिकेटला अलविदा करायचे होते. पण देशातील सुरक्षिततेच्या कारणास्तव तो मायदेशी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरु शकला नव्हता.