Join us

Corona Virus : भारतातील अस्वस्थ करणाऱ्या बातम्या पाहून अत्यंत दुःख होतंय!; शाहिद आफ्रिदीनं पुढे केला मदतीचा हात

आतापर्यंत १३ कोटी ८३ लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. सैन्यदलातील १५.५ लाख जणांना पहिला डोस दिला असून त्यात या दलांतील १ लाख आरोग्यसेवकही आहेत. सैन्यदलांतील ११.७ लाख लोकांना कोरोना लसीचा दुसराही डोस देण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 11:19 IST

Open in App

भारतात गेल्या २४ तासांत ३ लाख ४६ हजार ७८६ नवे रुग्ण आढळले. शनिवारी जगातील इतर देशांपेक्षा भारतात सर्वाधिक नवे रुग्ण सापडले. या दिवशी कोरोनामुळे २६२४ जणांचा मृत्यू झाला तसेच २ लाख १९ हजार रुग्ण बरे झाले आहेत. देशातील कोरोना रुग्णांची वाढत चाललेली संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर पडलेला ताण पाहून शेजारील राष्ट्रातून मदतीचा हात पुढे केला जात आहे. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) याच्यानंतर माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) यानंही मदतीचा हात पुढे केला आहे.   भारताला मदतीची गरज; त्यांच्यासाठी दान करा, त्यांना निधी गोळा करून द्या - शोएब अख्तर

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ६६ लाख झाली असून, त्यातील १ कोटी ३८ लाख जण बरे झाले. या संसर्गाने आतापर्यंत १ लाख ८९ हजार जणांचा बळी घेतला आहे. देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या २५ लाख ५२ हजार इतकी आहे. काही आठवड्यांमध्ये भारतीय रेल्वेचे ९३ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला आहे. 

शोएब अख्तर काय म्हणाला?''कोणत्याही सरकारला या संकटाचा सामना करणं जवळपास अशक्यच आहे. मी माझ्या सरकारला आणि चाहत्यांना आवाहन करतो की भारताला मदत करा. भारताला सध्या ऑक्सिजन टँकची गरज आहे. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी भारताला निधी मिळवून देण्यासाठी दान करा आणि ऑक्सिजन टँक्स त्यांच्यापर्यंत पोहोचवा,''असे आवाहन शोएबनं यूट्यूबवरून केलं आहे.  

शाहिद आफ्रिदीनं व्यक्त केली चिंताभारतातील अस्वस्थ करणाऱ्या बातम्या आणि व्हिडीओ पाहून अत्यंत दुःख होत आहे. आमच्या प्रार्थना सदैव तुमच्या पाठिशी आहेत, हे लक्षात असुद्या. या संकटसमयी शाहिद आफ्रिदी फाऊंडेशन मदतीचा हात पुढे करत आहे, असे आफ्रिदीनं ट्विट केलं आहे. त्यानं #HopeNotOut #WeAreInThisTogether हे ट्रेंडही वापरले आहेत.

जगभरात कोरोनाचे १४ कोटी ६२ लाख रुग्ण असून, त्यातील १२ कोटी ४१ लाख लोक बरे झाले आहेत. या संसर्गामुळे आतापर्यंत ३१ लाखांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या ३ कोटी २७ लाख कोरोना रुग्ण असून, त्यापैकी २ कोटी ५२ लाख लोक बरे झाले व ५ लाख ८५ हजार लोकांचा बळी गेला. या देशात सध्या ६८ लाख कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. ब्राझिलमध्ये कोरोना बळींची संख्या ३ लाख ८६ हजार आहे. बळींची ही संख्या भारतापेक्षा अधिक आहे. 

टॅग्स :शाहिद अफ्रिदीकोरोना वायरस बातम्याशोएब अख्तर