Join us
Daily Top 2Weekly Top 5

राहुल द्रविडकडून काहीतरी शिकलं पाहिजे; पाकिस्तानच्या दिग्गजांना शाहिद आफ्रिदीचा सल्ला!

पाकिस्तानला प्रतिभावान खेळाडूंची उणिव जाणवत आहे आणि त्यामुळे माजी खेळाडूंनी युवा खेळाडूंना घडवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा- शाहिद आफ्रिदी

By स्वदेश घाणेकर | Updated: January 17, 2021 08:24 IST

Open in App

भारतीय संघाचा महान फलंदाज राहुल द्रविड ( Rahul Dravid) याच्याकडे टीम इंडियाचे प्रशिक्षकपद चालून येत असतानाही त्यानं युवा पिढीला घडवण्याचा निर्णय घेतला. आताचा प्रत्येक युवा हा इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL) खेळण्याचं स्वप्न पाहतोय. त्यात काही चुकीचे नाही, परंतु राष्ट्रीय संघात खेळण्याची कमी होत असलेली इच्छा देशातील क्रिकेटसाठी धोकादायक आहे. त्यामुळे त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. तिच ओळखून द्रविडनं सुरुवातीला १९ वर्षांखालील व भारत अ संघाचे प्रशिक्षकपद भूषविले आणि आता तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडूंची पिढी घडवत आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आणि त्या संघातील दोन खेळाडू आज राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. 

राहुल द्रविडकडे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची जबाबदारी दिल्यानंतर टीम इंडियाकडे प्रतिभावान खेळाडूंची मजबूत फळी तयार झाली आहे. सध्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अनेक सीनिअर खेळाडू दुखापतीमुळे माघारी गेल्यानंतरही युवा खेळाडूंमुळे टीम इंडियानं आव्हान कायम ठेवले आहे. द्रविडकडून हिच गोष्ट पाकिस्तानच्या दिग्गजांनी शिकायला हवी, असं मत पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) यानं व्यक्त केलं आहे. 

''पाकिस्तानला प्रतिभावान खेळाडूंची उणिव जाणवत आहे आणि त्यामुळे माजी खेळाडूंनी युवा खेळाडूंना घडवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. या युवा खेळाडूंना योग्य मार्गदर्शन दिल्यास आपल्याकडेही मजबूत फळी तयार होईल,''असे आफ्रिदी म्हणाला. इंझमाम-उल-हक आणि युनिस खान यांनी युवा क्रिकेटपटूंना घडविण्याचं काम करावं, असं आफ्रिदीला वाटते.  

यावेळी त्यानं पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद आमीर याचाही मुद्दा मांडला. संघव्यवस्थापन मानसिक छळ करत असल्याचा आरोप करताना आमीरनं निवृत्ती जाहीर केली. त्यानं मुख्य प्रशिक्षक मिसबाह-उल-हक आणि वकार युनिस यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास नकार दिला. ''माझ्यावेळीही गोलंदाज व प्रशिक्षक यांच्यात वाद होते. पाकिस्तान क्रिकेट मंडळानं खेळाडूंचं ऐकायला हवं,''असेही तो म्हणाला.   

टॅग्स :शाहिद अफ्रिदीराहूल द्रविडपाकिस्तान