Join us

'आर्मी कॅप'वरून शाहिद आफ्रिदीनं उडवली भारतीय संघाची खिल्ली, पाहा व्हिडीओ...

रांची येथे झालेल्या तिसऱ्या वन डे सामन्यात भारतीय संघाने आर्मी कॅप घालून पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या CRPF जवानांना श्रंद्धांजली वाहिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 12:44 IST

Open in App

मुंबई : रांची येथे झालेल्या तिसऱ्या वन डे सामन्यात भारतीय संघाने आर्मी कॅप घालून पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या CRPF जवानांना श्रंद्धांजली वाहिली. पण, भारतीय संघाच्या या देशप्रेमानं पाकिस्तानचा जळफळाट झाला आणि त्यांनी थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे ( आयसीसी) तक्रार केली. आयसीसीनं सोमवारी दिलेल्या निकालानं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तोंडघशी पाडलं आहे. रांची येथील ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वन डे सामन्यात भारतीय संघाला ‘आर्मी कॅप’ घालण्याची परवानी दिली होती,’ असे आयसीसीनं स्पष्ट केलं. पण, पाकिस्तानचा माजी फलंदाज शाहिद आफ्रिदीनं याच मुद्यावरून भारतीय संघाची खिल्ली उडवली. 

८ मार्च रोजी रांची येथे झालेल्या या सामन्यातील सामना शुल्कही खेळाडूंनी राष्ट्रीय सुरक्षा निधीला प्रदान केली होती. पाकिस्तानने कॅप घालण्यावर आक्षेप नोंदविताच आयसीसीचे महाव्यवस्थापक क्लेरी फुलोंग यांनी याबाबत सांगितले की, ‘बीसीसीआयने निधी गोळा करण्यास व शहिदांच्या सन्मानार्थ कॅप घालण्याची परवानगी मागितली होती. दोन्ही गोष्टींची परवानगी आम्ही त्यांना दिली.’ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आयसीसीला बोचऱ्या शब्दात पत्र लिहून आर्मी कॅप घातल्याबद्दल भारताविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली होती. 

पाकिस्तान सुपर लीगमधील (पीएसएल) मुलतान सुलतान संघाने सोमवारी लाहोर कलंदरवर विजय मिळवला. त्यानंतर आफ्रिदीनं कराची येथील नॅशनल स्टेडियमला प्रदक्षिणा घातली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याला ; 'आर्मी कॅप' बद्दलच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यानं भारतीय संघाची खिल्ली उडवली. तो म्हणाला,''आर्मी कॅप घातली, नंतर काढली पण ना.'' पाहा व्हिडीओ... 

पाकिस्तानचा जळफळाट...तत्पूर्वी, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने आर्मीच्या कॅप्स परीधान केल्या होत्या. पुलावामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्याचा टीम इंडियाचा हा एक प्रयत्न होता. या साऱ्या गोष्टींना पाकिस्तानला जळफळाट झाल्याचे पाहायला मिळाले. कारण पाकिस्तानने याबाबत थेट आयसीसीकडे तक्रार केली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी " आयसीसीने भारताविरुद्ध कारवाई करायला हवी. जर आयसीसीने कारवाई केली नाही तर आम्ही विश्वचषकात काळ्या पट्ट्या बांधून निषेध करू." असे म्हटल्याचे रेडिओ पाकिस्तानने सांगितले होते. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाशाहिद अफ्रिदीपुलवामा दहशतवादी हल्ला