Join us  

भारताचा गोलंदाज शाहबाज नदीमने मोडला 20 वर्षांपूर्वीचा विक्रम

झारखंडच्या डावखुरा फिरकीपटू शाहबाज नदीमने लिस्ट 'A' क्रिकेटमधील 20 वर्षांपूर्वीचा विक्रम आपल्या नावे केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 1:07 PM

Open in App

मुंबई : झारखंडच्या डावखुरा फिरकीपटू शाहबाज नदीमने लिस्ट 'A' क्रिकेटमधील 20 वर्षांपूर्वीचा विक्रम आपल्या नावे केला. विजय हजारे क्रिकेट स्पर्धेत 'C' गटातील राजस्थानविरुद्धच्या सामन्यात नदीमने 10 षटकांत 10 धावा देत 8 विकेट घेतल्या. यामध्ये त्याने 4 षटकं निर्धाव टाकली. या कामगिरीसह त्याने 1997-98 मध्ये दिल्लीच्या राहुल संघवीने नोंदवलेला विक्रम मोडला. संघवीने भारताकडून एक कसोटी व 10 वन डे सामनेही खेळले आहेत. दिल्लीच्या या डावखुऱ्या फिरकीपटूने 1997-98 मध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये हिमाचल प्रदेशविरुद्ध 15 धावांत 8 विकेट घेतल्या होत्या.  नदीम भारत 'A' संघाचा नियमित सदस्य आहे आणि त्याने आपल्या कामगिरीने पुन्हा निवड समितीचे लक्ष वेधले आहे. लिस्ट 'A' क्रिकेटमध्ये नदीमने हा विक्रम नावावर केला असला तरी वन डे सामन्यात सर्वात कमी धावांत जास्त बळी टिपण्याचा विक्रम श्रीलंकेच्या चामिंडा वासच्या नावावर आहे. त्याने 8 डिसेंबर 2001 मध्ये कोलंबो येथे झिम्बाब्वेविरुद्ध 19 धावांत 8 विकेट घेतल्या होत्या.झारखंड संघाने नदीमच्या या कामगिरीच्या जोरावर राजस्थानचा संपूर्ण संघ 73 धावांत माघारी परतवला. राजस्थानने हे लक्ष्य 14.3 षटकांत 3 विकेटच्या मोबदल्यात पार केले.

या सामन्यात नदीम सर्वच्या सर्व दहा विकेट घेईल असे वाटत होते. मात्र, 19 वर्षांखालील विश्वविजेत्या भारतीय संघातील सदस्य अनुकुल रॉयने दोन बळी टिपले. लिस्ट 'A' क्रिकेटमध्ये नऊ विकेट घेण्याचा पहिला मान नदीमला मिळाला असता, परंतु शेवटच्या दोन षटकांत त्याला विकेट घेण्यात अपयश आले.  नदीमच्या नावावर 87 लिस्ट 'A' क्रिकेट सामन्यांत 124 विकेट आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 99 सामन्यांत 375 विकेट, तर ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्याने 109 सामन्यांत 6.77 च्या सरासरीने 89 विकेट घेतल्या आहेत. 

 

टॅग्स :भारतबीसीसीआय