Join us  

'लेडी सेहवाग' शफाली वर्माच्या 'बॉय कट'मागे आहे भारी गोष्ट; वाचून म्हणाल, 'ओ बाप्पूsss'

भारतीय महिलांच्या क्रिकेट संघाने ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यातच, आज झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या साखळी सामन्यातही भारतीय संघाने दमदार कामगिरी करत सहज विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 6:11 PM

Open in App

भारतीय महिलांच्या क्रिकेट संघाने ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यातच, आज झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या साखळी सामन्यातही भारतीय संघाने दमदार कामगिरी करत सहज विजय मिळवला. महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने चौथा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताला उपांत्य फेरीपर्यत पोहचवण्यामागे भारतीय संघाची सलामी फलंदाज शफाली वर्माचा खूप मोठा वाटा आहे. 16 वर्षीय असणारी शफाली वर्मा भारतीय संघाची एक उगवती क्रिकेटपटू असून तिला लेडी सेहवाग अशी उपमा दिली जात आहे. मात्र शफालीच्या या यशामागे तिच्या वडीलांचा खूप मोठा हातभार आहे हे सांगण्यास शफाली कधीच विसरत नाही.

मुलगी असल्यामुळे लहानपणी शफालीला अनेक क्रिकेट अकादमींनी तिला प्रशिक्षण देण्यास नकार दिला होता. मुली कुठे क्रिकेट खेळतात काय? हा तर मुलांचा खेळ आहे असे शफालीला लोकं सांगायचे. मात्र शफालीने क्रिकेट खेळणार म्हणजे खेळणार असे ठरविले होते. शफालीच्या या जिद्दीला तिच्या वडिलांचादेखील पाठिंबा होता. 

शफालीच्या वडिलांनी सांगितले की, शफालीने आठ वर्षांची असताना क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. दर रविवारी मी तिला शेजारच्या संघांकडून खेळवायचो पण बहुतेक संघ ती मुलगी असल्याने तिला खेळवायला नकार द्यायचे. तसेच तिला मुलांसोबत खेळताना काही दुखापत झाली तर मी तक्रार करेल असे त्यांना वाटायचे. माझी हरकत नाही असे सांगितल्यावरसुध्दा ते ऐकत नव्हते असं शफालीच्या वडिलांनी सांगितले.

शफालीची क्रिकेटची आवड आणि जिद्द पाहिल्यानंतर वडिलांनी शफालीचे केसच कापून टाकले आणि मुलगा बनवून तिला खेळवायला सुरुवात केली. शफालीच्या वडिलांना शफाली मुलांसोबत खेळताना चिंता वाटत नव्हती. उलट मुलांसोबत खेळुन शफाली अधिक पक्की होईल असा वडिलांना विश्वास होता. शफालीचे केस बॉय कट केल्यानंतर  घरापासून आठ किलोमीटर दूरवरच्या एका अकादमीत शफालीला प्रवेश मिळाला. त्यानंतर शफाली रोज आपली सायकल घेऊन क्रिकेट प्रशिक्षणास जाऊ लागली. 

शफालीने जयपूर येथील महिलांच्या ट्वेंटी- 20 स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तराच्या गोलंदाजांविरुध्द  31 चेंडूत 34 धावा करुन तिने लक्ष वेधले होते. यानंतर शफालीने भारतीय संघात स्थान मिळवले आणि भारताच्या महिला क्रिकेट संघातील ती सर्वात कमी वयाची खेळाडू ठरली. भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची  प्रेरणा घेवून क्रिकेट खेळाकडे वळली असल्याचे सांगत शफली सचिन तेंडुलकरची खूप मोठी चाहती आहे. 

दरम्यान श्रीलंकेविरुद्धच्या साखळी सामन्यात  भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत श्रीलंकेच्या संघाला 113 धावांत रोखले होते. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूंवर श्रीलंकेला पहिला धक्का बसला. त्यानंतर त्यांनी सातत्याने आपले फलंदाज गमावले आणि त्यांना 120 धावांची वेसही ओलांडता आली नाही. श्रीलंकेच्या सात फलंदाजांना यावेळी दोन अंकी धावसंख्याही उभारता आली नाही. भारताकडून राधा यादवने चार, तर राजेश्वरी यादवने दोन फलंदाजांना बाद केले. 

श्रीलंकेनं दिलेल्या 114 धावांचे आव्हान भारतीय संघाने 14.4 षटकांतच पूर्ण केले. विजयी घोडदौड करताना भारतीय संघाला 3 गडी गमावावे लागले. त्यामुळे भारताने श्रीलंकेवर 7 गडी राखून विजय मिळवला. शफाली वर्माने शानदार फटकेबाजी करत 34 चेंडूत 47 धावांचा पाऊस पाडला. त्यामुळे, भारताचा विजय सोपा झाला. मात्र, 47 धावांवर शफालीला धावबाद होऊन तंबूत परतावे लागले. तर स्मृती मानधना 17 आणि कर्णधार हरमनप्रीत कौर 15 धावांवर बाद झाल्या. अखेर, जेमीमाह रोड्रीगेस आणि दिप्ती शर्मा यांनी विजयी शेवट केला. या दोघींनीही 15-15 धावा करत टीम इंडियाच्या चौथ्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे. 

टॅग्स :आयसीसी महिला टी२० विश्वचषकभारतश्रीलंकासचिन तेंडुलकर