नवी दिल्ली : बीसीसीआयने वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची बुधवारी घोषणा केली. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी शिखर धवनकडे भारतीय संघाची धुरा सोपविण्यात आली असून अष्टपैलू रवींद्र जडेजा हा उपकर्णधार असेल. टीम इंडियाने शिखरच्या रूपात सात महिन्यांत सातवा आंतरराष्ट्रीय कर्णधार शोधला हे विशेष. मालिकेतील तिन्ही सामने पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळविले जातील.
रोहित शर्मा व विराट कोहलीसारख्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली. लोकेश राहुलही संघात नाही. ऋषभ पंत व हार्दिक पांड्या यांनाही विश्रांती देण्यात आली आहे.
विराटने २०२२ ची सुरुवात कसोटी कर्णधार म्हणून केल्यानंतर जानेवारीतच त्याने नेतृत्त्व सोडले. त्यानंतर रोहित दुखापतग्रस्त झाल्याने राहुलला एकदिवसीय संघाचा कर्णधार नेमण्यात आले. रोहितने नंतर काही मालिकांमध्ये नेतृत्व केले. पंत द. आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत कर्णधार होता. आयर्लंडविरुद्ध हार्दिकने नेतृत्व केले. जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत भारताचे नेतृत्व केले. आता शिखर धवन विंडीज दौऱ्यात कर्णधार असेल.
टीम इंडियाचा इंग्लंड दौरा
इंडियाचा इंग्लंड दौरा १७ जुलै रोजी संपणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्याला २२ जुलैपासून सुरुवात होईल. यादरम्यान खेळाडूंना विश्रांती मिळावी म्हणून रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या वरिष्ठ खेळाडूंना विंडीज दौऱ्यातून वगळण्यात आले आहे. एकदिवसीय सामन्यांची मालिका आटोपल्यानंतर विंडीजविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत यापैकी काही जण खेळू शकतील.
यंदाचे भारतीय संघाचे कर्णधार
द. आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका - विराट कोहली
द. आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका - लोकेश राहुल
श्रीलंका व वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका - रोहित शर्मा
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका - ऋषभ पंत
आयर्लंडविरुद्ध टी-२० मालिका - हार्दिक पांड्या
इंग्लंडविरुद्ध पाचवी कसोटी - जसप्रीत बुमराह
इंग्लंडविरुद्धची मर्यादित षटकांची मालिका - रोहित शर्मा
वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका - शिखर धवन