Join us

पाकिस्तानला मोठा झटका! १४०+ बॉलिंग करणारा खेळाडू सामना अर्ध्यातच सोडून मैदानाबाहेर

Haris Rauf Injured, PAK vs NZ: चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी करण्यासाठी सुरु असलेल्या मालिकेने वाढवलं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 21:06 IST

Open in App

Haris Rauf Injured, PAK vs NZ: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तिरंगी मालिका आयोजित केली आहे. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड विरुद्ध आयोजित केलेल्या या मालिकेचा पाकिस्तान ( Pakistan ) संघाला फायदा होईल अशी अपेक्षा होती. पण शनिवारी न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला मोठा झटका बसला. संघाचा स्फोटक गोलंदाज हरिस रौफ जायबंदी झाला आणि सामना अर्ध्यावर सोडून मैदानाबाहेर गेला. तो त्याचा गोलंदाजीचा कोटाही पूर्ण करू शकला नाही. रौफच्या दुखापतीमुळे पाकिस्तानी संघाच्या चिंतेत वाढ झाली असून आता तो चॅम्पियन्स ट्रॉफीमधून ( Champions Trophy 2025 ) बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

नेमके काय घडले?

हरिस रौफ हा पाकिस्तानी वेगवान गोलंदाजीचा एक महत्त्वाचा घटक आहे. तो सातत्याने १४०+ वेगाने गोलंदाजी करतो. तो सहसा मधल्या षटकांसह शेवटच्या षटकांमध्येही गोलंदाजी करतो. लाहोरमध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातही त्याने चांगली सुरुवात केली. ६ षटकांत त्याने फक्त २२ धावा देत टॉम लॅथमचा महत्त्वाचा बळी घेतला. पण डावाच्या ३७व्या षटकात दोन चेंडू टाकल्यानंतर त्याला वेदना जाणवू लागली. छाती आणि पोटाच्या मध्ये बरगड्यांजवळ प्रचंड वेदना होत असल्याने त्याने गोलंदाजी मध्येच सोडली आणि तो मैदानाबाहेर गेला. यानंतर तो पुन्हा गोलंदाजीसाठी मैदानात आला नाही.

संघातील वैद्यकीय कर्मचारी तपासणीसाठी मैदानात आले. त्यांनी हॅरिस रौफला काही प्राथमिक उपचार देण्याचा प्रयत्न केला. पण त्याची वेदना कमी होताना दिसली नाही. यानंतर, नाईलाजाने वैद्यकीय टीमने त्याला षटक मध्येच सोडून मैदानाबाहेर येण्याचा सल्ला दिला. दुखापतीमुळे त्याला वेदना होत होत्या. त्यातच सामना अर्ध्यावर सोडावा लागल्यामुळे रौफला खूप निराश आणि स्वत:वरच चिडलेलाही दिसला.

रौफ चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर होणार?

हॅरिस रौफ बाहेर पडल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याच्या दुखापतीबाबत काही वेळाने अपडेट दिली. त्यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, चेंडू टाकल्यानंतर रौफला अचानक छातीच्या आणि पोटाच्या डाव्या बाजूच्या स्नायूंमध्ये वेदना जाणवू लागल्या. तपासणीनंतर असे आढळून आले की त्याला साइड स्ट्रेन दुखापत झाली होती. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. लवकरच त्याच्या मैदानात परतण्याबाबत अपडेट देण्यात येईल.

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफीपाकिस्तानन्यूझीलंडद. आफ्रिका