Join us  

दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का! ऋषभ पंत IPL 2024ला देखील मुकणार? आता आली नवी अडचण

पंत यंदाच्या IPLमध्ये खेळेल असे दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केले होते पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 3:08 PM

Open in App

Rishabh Pant in IPL 2024: यंदाचा हंगाम २२ मार्चपासून सुरू होत आहे. यामध्ये रिषभ पंतच्या पुनरागमनाची सर्वांना प्रतीक्षा आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार पंत गेल्या मोसमात खेळू शकला नाही, कारण कार अपघातात त्याला लिगामेंटला दुखापत झाली होती. पंत यावर्षी पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे, परंतु पंतच्या चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतला अद्याप राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळालेले नाही. दिल्ली कॅपिटल्सचे संचालक सौरव गांगुली यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, पंतला एनसीएकडून 5 मार्च रोजी फिटनेस प्रमाणपत्र मिळेल, परंतु अहवालानुसार असे झालेले नाही. NCAने त्याला प्रमाणपत्र दिलेले नाही.

ऋषभ पंतचा ३० डिसेंबर २०२२ रोजी कार अपघात झाला होता, ज्यात तो गंभीर जखमी झाला होता. यामध्ये त्याला लिगामेंटला दुखापत झाली. यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली आणि त्यामुळे तो बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिला. आयपीएल 2024 मध्ये तो पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती परंतु आता नवी समस्या उभी राहिली आहे.

पंतला IPLमध्ये खेळण्यासाठी फिटनेस टेस्ट पास करावी लागली होती पण त्याला क्लिअरन्स मिळू शकला नसल्याची बातमी आहे. पंतची फ्रँचायझी टीम दिल्ली कॅपिटल्सने त्याचा फिटनेस अहवाल मागितला होता. पण त्यांना बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे पंत आयपीएल खेळण्याआधी अडचणीत सापडला आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, जेव्हा त्यांनी दिल्ली कॅपिटल्सला याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी या वृत्ताचे खंडन केले नाही. उलट फ्रँचायझीला याबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले.

वृत्तानुसार, फिटनेस क्लिअरन्सअभावी पंतला त्याच्या फ्रेंचायझीने संघात स्थान दिलेले नाही. पंत खेळला नाही तर दिल्ली संघाला मोठा धक्का बसू शकतो. संघाचा शेवटचा हंगाम चांगला गेला नाही. यावेळी पंतकडून खूप अपेक्षा होत्या. पंत IPLमध्ये खेळू शकणार की नाही हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. ९ मार्चपर्यंत पंतला फिटनेस प्रमाणपत्र मिळाले नसल्याची बातमी आहे.

टॅग्स :आयपीएल २०२३दिल्ली कॅपिटल्सरिषभ पंतबीसीसीआयसौरभ गांगुली