Join us

IPLसाठी खेळाडूंना पाठवा! BCCIचा विदेशी क्रिकेट बोर्डावर दबाव; सुरक्षा संदर्भातील चिंता कायम

भारत-पाकिस्तानदरम्यान तणाव वाढल्यानंतर ९ मे रोजी आयपीएल स्थगित करण्यात आले होते. मात्र, युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर यंदाची आयपीएल पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 06:56 IST

Open in App

नवी दिल्ली : १७ मेपासून सुरू होणाऱ्या आयपीएल-१८च्या उर्वरित सत्रासाठी खेळाडूंना पुन्हा भारतात पाठविण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि फ्रँचायझी विदेशी क्रिकेट बोर्डावर दबाव आणत आहेत. भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अजूनही काही सुरक्षा संदर्भातील चिंता कायम आहेत.

'बीसीसीआय'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयपीएलचे सीईओ हेमांग अमीन यांना क्रिकेट ऑस्ट्रेलिया तसेच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाशी थेट संपर्क साधून खेळाडूंच्या सुरक्षेबाबतच्या चिंता दूर करण्यास सांगितले आहे. भारत-पाकिस्तानदरम्यान तणाव वाढल्यानंतर ९ मे रोजी आयपीएल स्थगित करण्यात आले होते. मात्र, युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर यंदाची आयपीएल पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'आम्ही विदेशी बोर्डाशी थेट संवाद साधत आहोत. तसेच संघ स्वतःच्या खेळाडूंशी संपर्कात आहेत. बहुतांश खेळाडू परत येतील, अशी अपेक्षा आहे.' क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या खेळाडूंना भारतात परत जायचे की नाही, याचा निर्णय स्वतः घेण्यास मोकळीक दिली आहे. 

दरम्यान, काही विदेशी खेळाडूंमध्ये अजूनही शंका आहे, तरीही बहुतांश खेळाडू परत येण्याची शक्यता आहे. चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथ यांनी सांगितले, 'नवे वेळापत्रक सोमवारी रात्री जाहीर झाले. आम्ही आमच्या विदेशी खेळाडूंशी संपर्क साधत आहोत. आमचा सामना २० मे रोजी आहे, त्यामुळे आमच्याकडे वेळ आहे.'

पंजाब संघातील ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्कस स्टोइनिस आणि जोश इंग्लिस यांच्या परतण्याची शक्यता कमी आहे, तरीही मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग त्यांच्यासाठी प्रयत्न करत आहेत. ऑस्ट्रेलियाचे झेवियर बार्टलेट, अॅरोन हार्डी, अफगाणिस्तानचा अझमतुल्लाह उमरझई आणि दक्षिण आफ्रिकेचा मार्को यान्सेन यांचे भारतात परतणे अपेक्षित आहे.

परतण्याचा निर्णय खेळाडूंनी घ्यावा : सीए

'आयपीएलमध्ये परतण्याचा निर्णय हा खेळाडूंचा वैयक्तिक निर्णय असेल. ते जो काही निर्णय घेतील, त्याचा सन्मान केला जाईल,' असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) ने मंगळवारी स्पष्ट केले. भारत-पाकिस्तानदरम्यान युद्धविराम झाल्यानंतर बीसीसीआयने १७ मेपासून सहा ठिकाणी आयपीएलचे यंदाचे उर्वरित सत्र पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

मात्र, या निर्णयानंतर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या कसोटीपटूंपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. कारण, नव्या वेळापत्रकानुसार आयपीएलचा अंतिम सामना ३ जून रोजी होणार असून ११ जूनपासून लॉईस येथे ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका विश्व कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भिडणार आहेत.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले की, 'आयपीएल पुन्हा सुरू होणार असून खेळाडूंनी भारतात परत जायचं की नाही, हा वैयक्तिक निर्णय आम्ही त्यांच्यावर सोपविला आहे. खेळाडूंच्या निर्णयाचा आदर केला जाईल. आम्ही सुरक्षा व्यवस्थेबाबत बीसीसीआय आणि ऑस्ट्रेलियन सरकारच्या संपर्कात आहोत.' 

टॅग्स :आयपीएल २०२४इंडियन प्रिमियर लीग २०२५बीसीसीआय