Join us  

पंतवरून निवड समिती अन् कोहली यांच्यात मतमतांतर; पहिल्या कसोटीत साहाला मिळणार संधी?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा वारसा म्हणून रिषभ पंतकडे पाहिले जात असले तरी त्याला सातत्यानं येणारं अपयश निवड समितीची डोकेदुखी ठरत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 9:39 AM

Open in App

मुंबई, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा वारसा म्हणून रिषभ पंतकडे पाहिले जात असले तरी त्याला सातत्यानं येणारं अपयश निवड समितीची डोकेदुखी ठरत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन ट्वेंटी-20 सामन्यांत त्याला 4 व 19 धावा करता आल्या. फॉर्म मिळवण्यासाठी पंत विजय हजारे चषक स्पर्धेत दिल्लीकडून खेळणार आहे. त्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पुन्हा टीम इंडियाचा सदस्य होईल. पण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतला आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळण्याची संधी मिळणे अवघड आहे. या सामन्यात संघ व्यवस्थापक अनुभवी वृद्धीमान साहाला खेळवण्याची शक्यता अधिक आहे.

पण, रिषभ पंतवरून सध्या निवड समिती आणि संघ व्यवस्थापन यांच्यात वाद सुरू असल्याचीही चर्चा आहे. पंतला आणखी एक संधी द्यावी असं निवड समितीचं म्हणणं आहे,तर कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री सदस्य असलेल्या संघ व्यवस्थापनाला वृद्धीमान हवा आहे. ''पहिल्या कसोटीत अंतिम अकरामध्ये खेळवून पंतला अखेरची संधी देण्याची निवड समितीची इच्छा आहे, परंतु संघ व्यवस्थापनाला साहाला संधी द्यावीशी वाटत आहे,'' असे सूत्रांनी सांगितले आहे.

आशियाई देशाबाहेर कसोटीत दोन शतकं झळकावणारा पंत हा भारताचा एकमेव यष्टिरक्षक-फलंदाज आहे. निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनीही पंत हा पहिली पसंती असल्याचे स्पष्ट केले होते. पण, वेस्ट इंडिज दौऱ्यावरही पंत अपयशी ठरला. त्याने दोन वन डेत 20, तीन ट्वेंटी-20 त 66 आणि कसोटी मालिकेत 58 धावा केल्या. ''यश मिळत नसल्यानं पंतचा आत्मविश्वास डळमळला आहे. त्याचा परिणाम यष्टिमागील त्याच्या कामगिरीवरही होत आहे. DRS घेण्याचा निर्णयही अनेकदा चुकलेला आहे. भारतातील फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर तो चाचपडू शकतो. अशात साहा हा उत्तम पर्याय आहे आणि त्याने सराव सामन्यातही चांगली कामगिरी करून दाखवली आहे,'' असेही सूत्रांनी सांगितले.

कसोटी मालिकेचे वेळापत्रकपहिला सामनाः 2 ते 6 ऑक्टोबर - विशाखापट्टणम, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासूनदुसरा सामनाः 10 ते 14 ऑक्टोबर - पुणे, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासूनतिसरा सामनाः 19 ते 23 ऑक्टोबर - रांची, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून

भारताचा कसोटी संघ : विराट कोहली, मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुबमन गिल.

दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघः फॅफ ड्यू प्लेसिस ( कर्णधार), टेंबा बवुमा, थेयूनिस डी ब्रुयन, क्विंटन डी कॉक, डीन एल्गर, झुबायर हम्झा, केशव महाराज, एडन मार्क्राम, सेनुरन मुथूसामी, लुंगी एनगिडी, अॅनरीच नोर्टजे, व्हेर्नोन फिलेंडर, डॅन पिएड्त, कागिसो रबाडा, रुडी सेकंड.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारिषभ पंतवृद्धिमान साहा