Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोहली-शास्त्री आणि निवड समितीचं जुळता काही जुळेना... बीसीसीआयने घेतली दखल

बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने आज एका बैठकीचे आयोजन केले होते. त्यामध्ये निवड समिती आणि शास्त्री-कोहली यांच्यामध्ये बेबनाव असल्याची बाब समोर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 16:25 IST

Open in App
ठळक मुद्देसध्याच्या घडीला भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीमध्ये अनुभवी खेळाडू नाहीत. या गोष्टीचा फायदा शास्त्री-कोहली जोडी घेत असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघात नेमकं काय सुरु आहे, हे चाहत्यांसाठी अनाकलनीय आहे. कारण कधी भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हेच निवड समितीचे काम करतात, तर कधी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांची हुकुमशाही सुरु असल्याचंही कळतं. सध्या तर कोहली-शास्त्री आणि निवड समिती यांच्यामध्ये काहीच जुळत नसल्याची बाब समोर येत आहे. त्यासाठी बीसीसीआयच्या प्रशासकिय समितीने आज एक बैठक बोलावली होती.

बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने आज एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये शास्त्री, कोहली आणि रोहित शर्मा यांनाही बोलवण्यात आले होते. या बैठकीमध्ये बऱ्याच मुद्दयांवर चर्चा झाली. त्यामध्ये निवड समिती आणि शास्त्री-कोहली यांच्यामध्ये बेबनाव असल्याची बाब समोर आली आहे.

सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीमध्ये अनुभवी खेळाडू नाहीत. काही निवड समिती सदस्य यांना तर कसोटी क्रिकेटचा अनुभवही नाही. या गोष्टीचा फायदा शास्त्री-कोहली जोडी घेत असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शास्त्री-कोहली हे आपला संघ तयार करतात आणि ती यादी निवड समितीला पाठवतात, असे समजते. एखाद्या खेळाडूला संघात ठेवायचे किंवा नाही, हेदेखील शास्त्री-कोहली ठरवतात. त्यामुळे निवड समितीकडे काहीच हक्क राहत नसल्यामुळे त्यांनी बीसीसीआयकडे याबाबत तक्रार केली असल्याचे समजते. संघ व्यवस्थापन आणि निवड समिती यांच्यामध्ये कोणताही निर्णय एकमताने होत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

टॅग्स :विराट कोहलीरवी शास्त्रीरोहित शर्माबीसीसीआय