Join us
Daily Top 2Weekly Top 5

सानियाशी असं वागताना लाज वाटली नाही का? मलिकचं तिसरं लग्न; पाकिस्तानातील अभिनेत्री भडकली

शोएबने तिसरे लग्न केले असून सानियाला घटस्फोट दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 20:39 IST

Open in App

नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर ज्या चर्चा सुरू होत्या त्यांना शनिवारी अखेर पूर्णविराम मिळाला. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्यात सर्वकाही ठीक नसल्याचे समजत होते. पण, शनिवारी पाकिस्तानी खेळाडू शोएब मलिकने यावर शिक्कामोर्तब केला. शोएबने तिसरे लग्न केले असून सानियाला घटस्फोट दिला आहे. त्याने शनिवारी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करून ही माहिती दिली. यावरून पाकिस्तानातील अभिनेत्रीने मलिकला लक्ष्य केले असून सानियाच्या बाजूने पोस्ट केली आहे. 

शोएब मलिक (Shoaib Malik) आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) या दोघांच्या नात्यात आलबेल नसल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्या होत्या. याच दरम्यान शनिवारी शोएब मलिकने नवा संसार थाटल्याचे सोशल मीडियावरून जाहीर केले. सानियाशी असलेल्या तणावाच्या नात्यांच्या चर्चेदरम्यान, अचानक शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद (Sana Javed) हिच्यासोबत लग्नाचे फोटो पोस्ट केले. सानियाने दोन दिवसांपूर्वीच लग्न आणि घटस्फोट दोन्ही गोष्टी खूप कठीण असतात, अशा आशयाची स्टोरी पोस्ट केली होती. तसेच तिने शोएबसोबतचे सर्व फोटो सोशल मीडियावरून डिलीट केले होते.

शोएबने तिसरे लग्न केल्यानंतर पाकिस्तानातील अभिनेत्री सेहर शिनवारीने सोशल मीडियाच्या माध्यमातून मलिकवर निशाणा साधला. ती म्हणाली की, सर्व महिलांनी शोएब मलिकसारख्या अविश्वासू पुरुषांवर सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे. असे लोक त्यांच्या आयुष्यातील कोणत्याच स्त्रीसाठी पात्र नसतात. सानिया मिर्झासोबत असे करताना त्याला लाज वाटली नाही का? सेहर शिनवारीला तिच्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाते. 

शोएब आणि सानिया यांच्या नात्यात दोन वर्षांपासून हळूहळू दुरावा येण्यास सुरूवात झाल्याच्या चर्चा होत्या. एका मॉडेलसोबतचे स्विमिंग पूल मधील इंटिमेट फोटोशूट याला कारणीभूत ठरले होते. त्यानंतर सानिया-शोएब वेगळे होणार अशी सातत्याने चर्चा होती. त्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. सानियाने शोएबपासून तलाक घेतलेला नाही तर त्यांचा 'खुला' झाला आहे, असे सानियाच्या वडिलांनी सांगितले. लग्नाचे नाते जेव्हा पुरूषाकडून संपवले जाते तेव्हा त्यास तलाक म्हणतात आणि स्त्रीने लग्नाचे नाते संपवले तर त्याला खुला म्हणतात, अशी माहिती सांगितली जात आहे. त्यानुसार सानियाने खुला केला असल्याचे सांगितले. 

दरम्यान, पाच महिने डेट केल्यानंतर शोएब आणि सानिया यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नबंधनात अडकण्यापूर्वी दोघांनी त्यांच्या आधीच्या पार्टनरशी संबंध तोडले होते. शोएब त्याची पूर्वीश्रमीची पत्नी आयेशा सिद्दीकीपासून विभक्त झाला होता. तर, सानियाने सोहराब मिर्झासोबत साखरपुडा केल्यानंतर लग्न मोडलं होतं. १२ एप्रिल २०१० रोजी हैदराबादमध्ये ग्रँड पद्धतीने त्यांचं लग्न पार पडलं होतं. लग्नानंतर त्यांचे रिसेप्शन सियालकोटमध्ये झाले होते. लग्नाच्या ८ वर्षानंतर म्हणजेच २०१८ मध्ये या जोडप्याला एक मुलगा झाला ज्याचं नाव त्यांनी इझहान मिर्झा मलिक असं आहे. पण, कोरोना काळानंतर दोघांमधील नात्यात दुरावा आला. मग घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या आणि शनिवारी या चर्चांवर अखेर पडदा पडला.

टॅग्स :शोएब मलिकसानिया मिर्झा