Join us

दुसरी कसोटी: भारताची शानदार सुरुवात; रहाणेचे कुशल नेतृत्व, गोलंदाजांची चमकदार कामगिरी

सलामीवीर फलंदाज मयांक अग्रवाल (०) खाते न उघडताच मिशेल स्टार्कचे लक्ष्य ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 00:18 IST

Open in App

मेलबोर्न : पहिल्या कसोटीतील पराभव विसरताना भारताने अजिंक्य रहाणेचे कुशल नेतृत्व, जसप्रीत बुमराह व रविचंद्रन अश्विनच्या भेदक माऱ्याच्या जोरावर पुनरागमन करताना दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी शनिवारी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९५ धावांमध्ये गुंडाळला. प्रत्युत्तरात खेळताना भारताने ११ षटकांत १ गडी गमावत ३६ धावा केल्या होत्या.

सलामीवीर फलंदाज मयांक अग्रवाल (०) खाते न उघडताच मिशेल स्टार्कचे लक्ष्य ठरला. पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या शुभमन गिलने ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याला समर्थपणे तोंड देताना २८ धावा केल्या आहेत. दिवसअखेर त्याला चेतेश्वर पुजारा ७ धावा काढून साथ देत आहे.पहिल्या दिवसाच्या खेळात भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले, पण कार्यवाहक कर्णधार रहाणेला गोलंदाजांचा योग्य पद्धतीने उपयोग करण्याचे श्रेय मिळायला हवे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ७२.३ षटकांत संपुष्टात आला.

बुमराहने १६ षटकांत ५६ धावांच्या मोबदल्यात ४ आणि अश्विनने २४ षटकांत ३५ धावांच्या मोबदल्यात तीन बळी घेतले. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करीत असलेल्या मोहम्मद सिराजने १५ षटकांत ४० धावांच्या मोबदल्यात दोन फलंदाजांना माघारी परतवले. निवड समितीचा विश्वास सार्थ ठरविताना त्याने मार्नस लाबुशेन (४८) व कॅमरन ग्रीन (१२) यांना तंबूची वाट दाखविली. या मालिकेत शानदार फॉर्मात असलेल्या अश्विनने ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम फलंदाज स्टीव्ह स्मिथला खाते उघडण्यापूर्वीच बाद केले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा कर्णधार पेनचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या अंगलट आला. भारतीय गोलंदाजांनी त्याचा लाभ घेतला.

कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघ फिट भासला. खेळाडूंनी काही शानदार झेल टिपले. त्यांच्यात उत्साहाची कमतरता जाणवली नाही. रहाणेने पहिल्या तासातच अश्विनला पाचारण करण्याचा चांगला निर्णय घेतला. विविधतेसह अश्विनला खेळपट्टीकडून टर्न व उसळीही मिळाली. त्याने मॅथ्यू वेडला उंच फटका खेळण्यास बाध्य केले आणि जडेजाने त्याचा शानदार झेल टिपला.

स्मिथ गलीमध्ये तैनात पुजाराकडे झेल देत बाद झाला. रहाणेने सिराजला उपाहारापूर्वी एकही षटक दिले नाही. कारण तो जुन्या चेंडूने चांगला मारा करतो, याची कर्णधाराला कल्पना होती.उपाहारानंतर बुमराहने ट्रॅव्हिस हेडला बाद करीत लाबुशेनसोबतची त्याची ८६ धावांची भागीदारी संपुष्टात आणली. सिराजने लाबुशेनला बाद केले. त्याने ऑस्ट्रेलियातर्फे सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. त्याचा झेल गिलने टिपला.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअजिंक्य रहाणे