टी-२० विश्वचषकाची ‘रंगीत तालीम’; आजपासून आयपीएल १४चा दुसरा टप्पा यूएईच्या मैदानांवर रंगणार

महान फलंदाज सचिन तेंडुलकर यूएईत दाखल झाला. तो मुंबई इंडियन्स पथकाचा मेंटॉर आहे. याशिवाय संघाला मार्गदर्शन तसेच सपोर्ट स्टाफला सहकार्य करतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 09:18 AM2021-09-19T09:18:33+5:302021-09-19T09:21:24+5:30

The second phase of IPL 14 will be played in UAE from today | टी-२० विश्वचषकाची ‘रंगीत तालीम’; आजपासून आयपीएल १४चा दुसरा टप्पा यूएईच्या मैदानांवर रंगणार

टी-२० विश्वचषकाची ‘रंगीत तालीम’; आजपासून आयपीएल १४चा दुसरा टप्पा यूएईच्या मैदानांवर रंगणार

Next

दुबई: चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज रविवारी होणाऱ्या धडाकेबाज आणि तुल्यबळ सामन्याद्वारे इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या पर्वाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. याद्वारे खेळाडूंना टी-२० विश्वचषकाआधी यूएईतील परिस्थितीशी एकरुप होण्याची मोठी संधी मिळणार आहे.

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आयपीएल सामने मे मध्ये २९ सामन्यांनतर स्थगित झाले होते. पुन्हा असे घडू नये यासाठी क्रिकेटशौकिन आणि बीसीसीआय प्रार्थना करीत असावेत. दुसरा टप्पा आयोजित करण्यासाठी फार संघर्ष करावा लागला. दरम्यान इंग्लंड दौरा करणाऱ्या भारतीय संघातील काहीजण कोरोनाबाधित आढळताच बीसीसीआय अडचणीत आले होते. परंतु हा मुद्दा न बनता भारत आणि इंग्लंडचे खेळाडू येथे सुरक्षितपणे दाखल झाले. मागच्या वर्षी देखील आयपीएलचे आयोजन यूएईत झाल्याने यंदा देखील सामने यशस्वीपणे पार पडतील,अशी आयोजकांना आशा आहे.

टी-२० विश्वचषकासाठी सर्वच संघ जाहीर झाले असले तरी आयपीएलमधील कामगिरी नजरेआड करता येणार नाही. कुणी खेळाडू जखमी झाल्यास त्याची जागा कुणीही घेऊ शकतो. आयसीसीने त्यासाठी १० ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे.

विश्वचषकानंतर टी-२० चे कर्णधारपद सोडण्याची घोषणा करणारा विराट कोहली आरसीबीला पहिले जेतेपद मिळवून देण्यात इच्छूक असेल. दुसरीकडे मागील सत्रातील उपविजेत्या दिल्लीला पहिल्या जेतेपदाची अपेक्षा आहे. गुणतालिकेत दिल्ली अव्वल असून चेन्नई, बॅंगलोर आणि मुंबई हे पहिल्या चार स्थानांवर आहेत.

पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांना मात्र काही खेळाडूंच्या माघारीचा फटका बसला. अन्य खेळाडू त्यांची उणिव कशी भरुन काढतील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सचिन दुबईच्या मैदानात
महान फलंदाज सचिन तेंडुलकर यूएईत दाखल झाला. तो मुंबई इंडियन्स पथकाचा मेंटॉर आहे. याशिवाय संघाला मार्गदर्शन तसेच सपोर्ट स्टाफला सहकार्य करतो.सचिनची उपस्थिती खेळाडूंसाठी मनोबल उंचावणारी ठरते. विशेष म्हणजे त्याला मुलगा अर्जुन तेंडुलकर हा देखील याच संघातून खेळतो.पाच दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीनंतर शनिवारी सचिनने दुबई स्टेडियमला भेट दिली.

- २०१९ नंतर आयपीएल सामन्यांना आता प्रथमच मर्यादित संख्येने प्रेक्षक उपस्थित राहणार असल्याने स्पर्धेचा रोमांच वाढणार आहे.

- येथे ३१ सामने खेळले जातील. याचा अर्थ सर्वच सामन्यांसाठी नवनव्या खेळपट्ट्या असतील. मंद खेळपट्ट्यांवर सावध सुरुवात हा मूलमंत्र असेल.

चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सलामी लढत -
- मुंबईने ७ पैकी ४ तर चेन्नईने ७ पैकी ५ सामने जिंकले आहेत. मागच्या सत्रात दारुण कामगिरी करणाऱ्या चेन्नईला ऋतुराज गायकवाड,इम्रान ताहिर, मोईन अली रवींद्र जडेजा यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना हे देखील फॉर्ममध्ये परतण्याची आशा आहे. मुंबईला फलंदाजीत मधल्या फळीत आणि गोलंदाजीत पॉवर प्लेमध्ये कामगिरी उंचावण्याचे आव्हान असेल. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि लेगस्पिनर राहुल चहर यांनी विश्वचषकासाठी संघात स्थान मिळविल्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासत भर पडली असावी. हार्दिकने नियमित गोलंदाजी केल्यास पर्याय उपलब्ध असतील.
 

Web Title: The second phase of IPL 14 will be played in UAE from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app