मुंबई : भारत-श्रीलंका याच्यातील एकदिवशीय क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेताना अटक केलेल्या तिघा बुकींची कसून चौकशी सुरू असून, त्याची व्याप्ती दुबईपर्यंत पोहोचल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. जप्त केलेले मोबाइल व दूरध्वनीचा तपशील (सीडीआर) तपासण्यात येत असून, या प्रकरणात आणखी काही जणांना अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दीपक कपूर, तरुण ठाकूर आणि त्याचा चुलत भाऊ सनी कपूर यांना शुक्रवारी रात्री गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष-९च्या पथकाने अंधेरीतील डी.एन. नगरमधील त्यांच्या कार्यालयातून अटक केली होती.
तिघांकडून १३ मोबाइल, लॅपटॉप व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यांचा अहमदाबाद, दिल्ली आणि दुबईपर्यंत बेटिंगचा व्यवहार सुरू होता. या प्रकरणी अजूनही काही जणांना अटक होण्याची शक्यता या अधिकाºयाने व्यक्त केली आहे. रिअल इस्टेट म्हणवणारा कपूर हा टोळीचा म्होरक्या असून, काही वर्षांपूर्वी किरकोळ स्वरूपात सट्टा लावण्याचे काम करीत होता. त्याच्यासोबत काम करणाºयाच्या मदतीने ते सट्टा लावण्याचे काम करायचे, अशीही माहिती पोलिसांना मिळाली आहे.