नवी दिल्ली : आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करणारा वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीने काही सहकारी खेळाडूंवर वर्णद्वेषी उपनावाने संबोधल्याचा आरोप केला असून त्या खेळाडूंनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. या खेळाडूंमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माचाही समावेश असू शकतो. यामुळे ईशांतची कारकीर्दही धोक्यात येऊ शकते.
सॅमीने यापूर्वी म्हटले होते की, त्याला ‘कालू’ म्हणून बोलविण्यात येत होते. कालू हे उपनाव वर्णद्वेषी आहे, हे सॅमीला आता कळले. ‘कालू’ कृष्णवर्णीय लोकांचे वर्णन करणारा अपमानजनक शब्द आहे. सॅमीने अमेरिकेतील आफ्रिकी मूळच्या जॉर्ज फ्लॉयडची श्वेत पोलीस कर्मचाऱ्यातर्फे हत्या करण्यात आल्यानंतर अमेरिकेत होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आपले मत मांडले. सॅमीने इन्स्टाग्रामवर लिहिले की, सनरायजसतर्फे २०१३-१४ मध्ये खेळताना संघातील खेळाडू त्याला या नावाने बोलवत होते.
या खेळाडूंमध्ये ईशांतचाही समावेश असू शकतो. त्याने १४ मे २०१४ ला एक छायचित्र शेअर करताना सॅमीसाठी ‘कालू’ या शब्दाचा वापर केला होता. याच वर्षी सॅमीने व्हीव्हीएस लक्ष्मणला (संघाचे तत्कालीन संरक्षक) वाढदिवसानिमित्त एक फोटो शेअर करताना स्वत:साठी कालू या शब्दाचा वापर केला होता.
सॅमीने संघसहकाऱ्यांपैकी कुणाचे नाव न घेता त्यांच्यासोबत संपर्क साधत त्यांना माफी मागण्यास सांगितले आहे. सॅमी म्हणाला,‘मी संघहिताचा विचार करतो आणि मला वाटले की हा शब्द गमतीचा असेल. पण, ज्यावेळी हा शब्द गमतीचा नसून अपमानजनक आहे हे कळले त्यावेळी तुम्ही माझी निराशा व राग समजू शकता.’ ईशांतने एका अन्य इन्स्टाग्राम पोस्टवर म्हटले की, सॅमी चांगली व्यक्ती व जवळचा मित्र आहे.’ (वृत्तसंस्था)
‘जे मला या नावाने बोलवत होते त्यांना स्वत:ला याची कल्पना आहे. त्यांनी माझ्यासोबत संपर्क करावा व चर्चा करावी. मी त्या सर्वांना संदेश पाठविणार आहे. तुम्हाला सर्वांना स्वत:बाबत माहीत आहे. मला त्यावेळी या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता, हे मी कबूल करतो.
-डॅरेन सॅमी
धर्माच्या आधारे भेदभाव हा वर्णद्वेषच -इरफान
वर्णद्वेषावरून जगभरात सुरू असलेल्या चर्चेत मंगळवारी माजी डावखुरा गोलंदाज इरफान पठाण याने स्वत:चे मत मांडले. वर्णद्वेष केवळ त्वचेच्या रंगापर्यंत मर्यादित नाही, धर्माच्या आधारे अनेकदा वर्णद्वेषाला बळी पडावे लागते, असे इरफान म्हणाला. सर्वत्र वर्णद्वेषाचीच चर्चा सुरू आहे. याविषयी पठाणने टिष्ट्वट केले, ‘वर्णद्वेष केवळ त्वचेपुरता मर्यादित नाही. अन्य धर्माचा असल्यामुळे सोसायटीत घर खरेदी करण्यास मज्जाव होतो, हादेखील वर्णद्वेष आहे.’