शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियासह महिला क्रिकेट संघ, १९ वर्षांखालील भारतीय संघासोबतच मुंबई इमर्जिंग टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. मुंबईच्या संघाकडून सरफराज खानचा धाकडा भाऊ मुशीर खान याने इंंग्लंडच्या मैदानात धमाकेदार कामगिरीनं सर्वांचं लक्षवेधून घेतले आहे. इंग्लंड दौऱ्यात त्याने सलग तीन शतके झळकावली आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इंग्लंडच्या मैदानात शतकांची हॅटट्रिक
लोबॉरो यूसीसीई संघाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात मुशीर खान याने ११६ चेंडूत १४ चौकार आणि एका षटकारासह ८७.९३ च्या स्ट्राइक रेटनं १०२ धावांची खेळी केली. याआधी चॅलेंजर्स विरुद्धच्या सामन्यात मुशीर खान याने १२७ चेंडूत १२५ धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीत ११ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. ३० जूनला नॉटिंघमशायर सेकंड XI विरुद्धच्या लढतीत त्याने १२७ चेंडूत १२३ धावांची खेळी केल्याचे पाहायला मिळाले होते.
गांगुलीची 'दादागिरी'! लॉर्ड्सच्या बाल्कनीत शर्टलेस होण्यापलिकडची गोष्ट
गोलंदाजीतही सोडली खास छाप
फलंदाजीशिवाय मुशीर खान याने गोलंदाजीतही आपला जलवा दाखवून दिला आहे. दुसऱ्या सामन्यात त्याने १० विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्याचे पाहायला मिळाले. उजव्या हाताने फलंदाजी करणारा मुशीर खान डावखुऱ्या हाताने ऑफ स्पिन (Slow Left arm Orthodox) गोलंदाजी करतो. दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात ३८ धावा खर्च करताना त्याने ६ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. याशिवाय दुसऱ्या डावात त्याने चार फलंदाजांची शिकार केली. त्याने शतकी खेळीशिवाय गोलंदाजीत धमक दाखवली. पण हा सामना अनिर्णित राहिला.
अपघातातून सावरून उतरलाय मैदानात
गत वर्षी इराणी कप स्पर्धेआधी मुशीर खान याचा कार अपघात झाला होता. लखनौ जवळ झालेल्या अपघातात मुशीरच्या मानेला दुखापत झाली होती. या अपघातामुळे त्याच्यावर बरेच दिवस क्रिकेटपासून दूर राहण्याची वेळ आली. आयपीएल २०२५ स्पर्धेत तो पंजाब किंग्ज संघाचा भाग होता. इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात त्याला एकमेव सामन्यात संधी मिळाली. ज्यात त्याला खातेही उघडता आले नाही. गोलंदाजीत त्याने मयंक अग्रवालची विकेट घेतली होती. मुशीर खानचा भाऊ सरफराज खान हा टीम इंडियाकडून खेळला आहे. इंग्लंड दौऱ्यात त्याला टीम इंडियातून डावलण्यात आले असताना त्याचा भाऊ इंग्लंडचं मैदान गाजवताना दिसतोय.