Join us  

टीम इंडियानं दोन मालिकांमध्ये बाकावर बसवलेल्या संजू सॅमसनचं खणखणीत शतक

बांगलादेश आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत संघात निवड होऊनही सॅमसनला बाकावरच बसवून ठेवण्यात आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 3:45 PM

Open in App

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात रिषभ पंतने साजेशी कामगिरी केली. पण, महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतल्यानंतर रिषभला सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्याच्या जागी संघात स्थान मिळालेल्या संजू सॅमसनला अंतिम अकरात खेळवावे, अशी मागणी जोर धरत होती. पण, बांगलादेश आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत संघात निवड होऊनही सॅमसनला बाकावरच बसवून ठेवण्यात आले. विंडीजविरुद्धच्या वन डे संघात त्याचा समावेश नसल्यानं त्यानं आपला मोर्चा रणजी करंडक स्पर्धेत वळवला. हंगामातील पहिलाच रणजी सामना खेळताना सॅमसननं खणखणीत शतक ठोकून, आपल्यातील गुणवत्ता पुन्हा एकदा निवड समितीच्या निदर्शनास आणून दिली.

केरळ आणि बंगाल यांच्यातला सामना आजपासून सुरु झाला. केरळनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विष्णू विनोद ( 0), राहुल पी ( 5) आणि जलाज सक्सेना (9) हे फलंदाज लगेच माघारी परतल्यानंतर सॅमसननं केरळचा डाव सावरला. कर्णधार सचिन बेबीही 10 धावा करून तंबूत परतला. पण, सॅमसन एका बाजूनं टिकून राहिला. त्यानं रॉबीनसह केरळला मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं वाटचाल करून दिली. रॉबीन 50 धावा करून माघारी परतला. पण, सॅमसन अजूनही खेळपट्टीवर चिकटून आहे. सॅमसननं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 10वे शतक झळकावत 3000 धावा पूर्ण केल्या त्यानं 161 चेंडूंत 14 चौकार व 1 षटकार खेचून नाबाद 102 धावा केल्या आहेत. 

टॅग्स :रणजी करंडककेरळभारतीय क्रिकेट संघ