Join us  

संजय मांजरेकर म्हणतात हार्दिक पांडयाच्या वागणुकीत उद्दामपणा, गावसकरांनीही सुनावले खडेबोल

संपूर्ण करीयरमध्ये सचिनचा आत्मविश्वास कधीही उद्दामपणामध्ये बदलला नाही असे संजय मांजरेकर म्हणाले. पांडया बाद होण्याआधी विराट कोहलीने 21 वे शतक झळकावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 4:08 PM

Open in App
ठळक मुद्दे कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेले गावसकर आणि संजय मांजरेकर यांनी हार्दिकला फैलावर घेतले. दुस-या बाजूला संजय मांजरेकरांनीही हार्दिकची खरडपट्टी काढली.

सेंच्युरियन पार्क - भारताचे महान क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक सुनील गावसकर यांनी सोमवारी अत्यंत कठोर शब्दात अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांडयाचा समाचार घेतला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या दुस-या कसोटी सामन्यात हार्दिक ज्या पद्धतीने धावबाद झाला ते पाहून गावसकरांनी  हार्दिकला खडेबोल सुनावले. हार्दिकने मिड ऑनला चेंडू ढकलून चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. समोरच्या टोकाला उभ्या असलेल्या कोहलीने धोका ओळखून हार्दिकला पुन्हा त्याच्या क्रिझकडे फिरण्याचा संदेश दिला. 

पांडया त्याच्या क्रिझमध्ये पोहोचत असतानाच वरनॉन फिलँडरने फेकलेल्या चेंडूने थेट स्टंम्पसचा वेध घेतला. सुरुवातीला पांडया आरामात क्रिझमध्ये पोहोचलाय असे वाटले. पण रिप्लेमध्ये पांडयाची बॅट आणि पाय हवेत असताना चेंडूने स्टंम्पसचा वेध घेतल्याचे दिसले. त्यामुळे पंचांनी पांडयाला बाद दिले. पांडयाने  अक्षरश: शाळकरी मुलाप्रमाणे दक्षिण आफ्रिकेला आपली विकेट बहाल केली. 

 

हार्दिक अशा पद्धतीने बाद झाल्याचे पाहून कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेले गावसकर आणि संजय मांजरेकर यांनी हार्दिकला फैलावर घेतले. हार्दिकने अक्ष्मय अशी चूक केली असे गावसकर म्हणाले. दुस-या बाजूला संजय मांजरेकरांनीही हार्दिकची खरडपट्टी काढली. हार्दिकच्या वर्तनात उद्दामपणा दिसतो. मांजरेकरांनी हार्दिकला सचिन तेंडुलकरचे उदहारण दिले. संपूर्ण करीयरमध्ये सचिनचा आत्मविश्वास कधीही उद्दामपणामध्ये बदलला नाही असे संजय मांजरेकर म्हणाले. पांडया बाद होण्याआधी विराट कोहलीने 21 वे शतक झळकावले. कोहलीने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत भारताचा डाव सावरला. कोहलीचे परदेशातील हे 11 वे शतक आहे. 

 

टॅग्स :हार्दिक पांड्याभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८