Anaya Bangar Boy to Girl Story: भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर ( Sanjay Bangar) याचे नाव गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. संजय बांगर सध्या IPL मध्ये समालोचक म्हणून भूमिका बजावतोय. पण त्याच्या नावाची चर्चा होण्याचे कारण वेगळे आहे. संजय बांगरचा मुलगा आर्यन बांगर याने नुकतेच लिंगबदल शस्त्रक्रिया केली. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीअंतर्गत आर्यन आता मुलगी झाली. तिने अनाया बांगर अशी नवीन ओळखही मिळवली आहे. सध्या ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून नावारुपास येत आहे. मुलगा म्हणून जन्माला आल्यानंतर मुलगी व्हावेसे का वाटले आणि त्याची जाणीव केव्हापासून सुरु झाली, याबद्दल अनया बांगरने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले.
मुलगी बनण्याचा निर्णय का घेतला?
"आपण मुलगा आहोत पण आपण मुलगी असायला हवे होते असे काही लोकांना वाटते. प्रत्येकाला ही समज वेगवेगळ्या वयात असताना येते. मी जेव्हा ८-९ वर्षांची होते, तेव्हा मी लपूनछपून आईच्या खोलीत जायचे, तिच्या कपाटातून कपडे घेऊन माझ्या खोलीत यायचे आणि ते कपडे घालून आरशासमोर स्वत:ला पाहायचे. त्यावेळी मला वाटायचं की मी मुलगीच आहे आणि मला मुलगी व्हायचं आहे," असे अनाया बांगरने लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
२०२१ मध्ये अखेर निर्णय घेतला...
"मी मुलगा म्हणून २०२१ पर्यंत क्रिकेट खेळत होते. दरम्यानच्या काळात मी खूप विचार करत होते. मी मुलगा आहे की मुलगी याचा मीच शोध घेत होते. सुरुवातीला मी असाही विचार केला होता की मी लिंगबदल शस्त्रक्रिया करायला नको कारण त्याने माझ्या जीवनावर वाईट परिणाम होतील. जर मी ट्रान्सडेंजर झाले तर माझ्याबद्दल लोक काय बोलतील, क्रिकेटवर्तुळात लोक माझ्याबद्दल काय बोलतील, याचा मी भरपूर विचार करायचे. एक अशीही वेळ आली की मला डिप्रेशन आले, मला गोळ्या घ्याव्या लागल्या, मी ड्रेसिंग रूममध्ये असताना मॅचच्या आधी किंवा बॅटिंगला जाण्याआधी लपून रडायचे. अखेर एक दिवस असा आला की मला क्रिकेटबद्दल चिड निर्माण झाली कारण मला स्वत:बद्दलच शंका होत्या. त्यावेळी अखेर मी निर्णय घेतला," अशा भावना तिने व्यक्त केल्या.