Join us
Daily Top 2Weekly Top 5

रैनासोबत कॅचची प्रॅक्टीस करणारा खेळाडू पाडतोय धावांचा पाऊस

2011 मध्ये रणजी सामन्यात भारतीय संघातील खेळाडू सुरेश रैनाने एका लहान मुलाला कॅच प्रॅक्टीससाठी बोलावले होते. तो आज धावांचा पाऊस पाडत आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 13:06 IST

Open in App

नवी दिल्ली : 2011 मध्ये मेरठ येथील गांधी बाग स्टेडियमवर उत्तर प्रदेश आणि सौराष्ट्र यांच्यात रणजी सामना खेळवण्यात आला होता. त्या सामन्याच्या सरावासाठी भारतीय संघातील खेळाडू सुरेश रैनाने एका लहान मुलाला कॅच प्रॅक्टीससाठी बोलावले होते. त्या मुलाच्या कौशल्यावर प्रभावित झालेल्या रैनाने स्वतःचा चष्मा भेट दिला. रैनाने विश्वास दाखवलेला हा खेळाडू आज धावांची आतषबाजी करत आहे. समीर रिझवी असे या खेळाडूचे नाव असून तो उत्तर प्रदेश संघाच्या 16 वर्षांखालील संघाचा कर्णधार आहे.

मेरठच्या भामाशाह पार्क येथे बीसीसीआयची 16 वर्षांखालील विजय मर्चंट चषक क्रिकेट सामना सुरू आहे. यात समीरने उत्तराखंडविरुद्ध एका दिवसात 34 चौकार आणि पाच षटकार खेचून 280 धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर उत्तर प्रदेशने दुसऱ्या दिवसअखेर चार बाद 489 धावा केल्या आहेत. उत्तराखंडचा पहिला डाव 227 धावांवर गडगडला. आत्तापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांत समीरने 538 धावा केल्या आहेत. उत्तर प्रदेश संघाच्या निवड समिती सदस्यांसमोर समीरने मैदानाच्या चहुबाजूला फटकेबाजी केली. दिवसाचा खेळ संपण्याच्या दोन षटकं आधी समीर बाद झाला. त्याचे हे सलग तिसरे शतक, तर कारकिर्दीतले पहिले द्विशतक आहे. मागील दोन सामन्यांत त्याने 108 व 150 धावांची खेळी केली होती. मागील हंगामातही 15 वर्षीय समीरने 600 धावा केल्या होत्या. त्याआधी त्याने 5 सामन्यांत 415 धावा चोपल्या होत्या. याच सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याने भारताच्या 19 वर्षांखालील संघातही स्थान पटकावले आहे.  

टॅग्स :सुरेश रैनाबीसीसीआय