Sunil Gavaskar Helps Vinod Kambli: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी काही महिन्यांपूर्वी चर्चेत आला होता. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यानंतर तो आजारी असल्याचे समजले. त्यानंतर डिसेंबर महिन्यात ठाण्यातील हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल झाला होता. त्यानंतर नर्सिंग केअरसाठी तो पुन्हा रुग्णालयात दाखल झाला. फिजिओथेरपी, फिटनेस ट्रेनिंग आणि त्याच्या आहाराकडे बारकाईने लक्ष दिले जात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. तसेच त्याच्या दातांची ट्रीटमेंटदेखील करण्यात आल्याचे सांगितले गेले होते. विनोद कांबळीला मेंदूचादेखील त्रास असल्याने त्याची विशेष काळजी घेतली घ्यावी लागते. याच दरम्यान, भारताचे माजी कर्णधार लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी विनोद कांबळीसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
दर महिन्याला विनोद कांबळीला किती पैसे मिळणार?
टीओआयच्या अहवालानुसार, विनोद कांबळीला सुनील गावसकर यांच्या चॅम्प्स फाउंडेशनकडून मदत दिली जात आहे. गरजू आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना मदत करण्याच्या उद्देशाने सुनील गावसकर यांच्या चॅम्प्स फाउंडेशनची सुरुवात १९९९ मध्ये झाली. या मदतीअंतर्गत कांबळीला त्याच्या संपूर्ण आयुष्यासाठी दरमहा ३०,००० रुपये दिले जातील. याशिवाय, त्याला संपूर्ण वर्षासाठी वैद्यकीय खर्च म्हणून वेगळे ३०,००० रुपये मिळतील. फाउंडेशनकडून विनोद कांबळीला दरमहा ३०,००० रुपये देण्याची प्रक्रिया १ एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे.
जानेवारीमध्ये बैठक, एप्रिलमध्ये मदतीचा हात
११ जानेवारीला वानखेडे स्टेडियमच्या ५०व्या वर्धापन दिनानिमित्त सुनील गावस्कर आणि विनोद कांबळी यांची भेट झाली. त्या भेटीनंतर गावसकर यांच्या फाउंडेशनने हा निर्णय घेतला. सुनील गावस्कर यांच्या फाउंडेशनचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विनोद कांबळी यांची प्रकृती बरीच खालावली होती. त्याला मूत्रसंसर्ग झाला होता, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या साऱ्या घटनेनंतर गावसकर यांनी दोन डॉक्टरांची भेट घेतली आणि त्यानंतर विनोद कांबळीला मदत करण्याचा इरादा पक्का केला.
अशी मदत मिळणारा कांबळी दुसरा क्रिकेटपटू
भारतासाठी १७ कसोटी आणि १०४ एकदिवसीय सामने खेळणारा विनोद कांबळी हा सुनील गावस्कर यांच्या चॅम्प्स फाउंडेशनकडून मदत मिळवणारा दुसरा क्रिकेटपटू असेल. त्याच्या आधी या फाउंडेशनने माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांनाही मदत केली आहे.
Web Title: Salute to Sunil Gavaskar steps up to help Vinod Kambli in his odd times health issue Champs Foundation to give him money every month
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.