मुंबईतील वानखेडेच्या मैदानातील भारत-इंग्लंड यांच्यातील सेमीफायनल सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झाला. विक्रमी २५४ धावांचे टार्गेट सेट करूनही भारतीय संघाने फक्त ७ धावांच्या विजयासह फायनल गाठली. २२ वर्षीय जेकब बेथेलच्या दमदार खेळीमुळे इंग्लंडच्या संघाने तगडी टक्कर दिल्याचे पाहायला मिळाले. हा सामना पाहण्यासाठी भारताचा माजी आणि यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी ही जोडी स्टेडियमवर उपस्थितीत होती. सामना अगदी रंगतदार स्थितीत पोहचला असताना साक्षी धोनी विकेट मिळाल्याचा आनंद साजरा करताना दिसली. पण बुमराहच्या गोलंदाजीवर विकेट नसताना तिचा जल्लोष पाहून धोनीला हसू अनावर झाले. तो तिला उड्या मारू नकोस शांत हो... असे म्हणताना दिसून आले. नेमकं काय घडलं? इथं जाणून घेऊयात ती मेजशीर गोष्ट
बुमराहच्या गोलंदाजीवर विकेट नसताना साक्षीचा जल्लोष! धोनीला हसू अनावर
भारत-इंग्लंड यांच्यातील सेमीफायनलमधील सामन्यादरम्यान साक्षी धोनी टीम इंडियाला मोठ्या उत्साहासह चीअर करताना दिसली. भारताच्या डावातील १८ व्या षटकात जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला. या षटकात त्याने सॅम करनला पहिला चेंडू टाकला. इंग्लंडच्या बॅटरनं हा चेंडू हलक्या हाताने पुन्हा बुमराहच्या दिशेनं टोववला. चेंडू बुमराहच्या हातात गेल्यावर साक्षीला विकेट मिळाल्याचा गैरसमज झाला. त्यामुळे ती उड्या मारून या विकेटचा आनंद साजरा करताना दिसली. तिच्या मागे उभा असलेला धोनी ही विकेट नाही, शांत खाली बस... असे हातवारे करुन सांगताना दिसून आले. दोघांच्यातील हा मजेशीर क्षणानंतर आजूबाजूचे सगळेच हसू लागले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.
धोनीनं याआधीही शेअर केला होता साक्षीसोबतचा मजेशीर किस्सा
महेंद्रसिंह धोनी आणि साक्षी धोनी यांच्यात कमालीची केमिस्ट्री पाहायला मिळते. पण क्रिकेटबद्दल साक्षीला फारसे कळत नाही, ही गोष्ट धोनीनं याआधीही एका मुलाखतीत बोलून दाखली होती. धोनी म्हणाला होता की, "आम्ही घरी एकत्र मॅच पाहत बसलो होतो. वाइड चेंडूवर फलंदाज यष्टिचीत झाल्यावर तो नाबाद असल्याचे साक्षी म्हणाली. मी तिला समजावलं की, नो बॉलवर स्टंपिग दिले जात नाही. पण वाइड चेंडूवर फलंदाजाला बाद दिले जाते. यावर ती मला म्हणाली की, तुला काहीच माहिती नाही. फलंदाजाने मैदान सोडल्यावरही तिने काही तरी गडबड झाली, अशी प्रतिक्रिया दिली होती."