Join us  

वाढदिवसादिवशीच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने उडवली सचिनची खिल्ली, फॅन्सनी ट्विटरवर केली धुलाई 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस क्रिकेटप्रेमी विविध माध्यमांतून साजरा करत आहेत. मात्र याच दिवशी  क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा आपल्यातील कद्रूपणाचा प्रत्यय घडवला आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 12:23 PM

Open in App

नवी दिल्ली - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस क्रिकेटप्रेमी विविध माध्यमांतून साजरा करत आहेत. मात्र याच दिवशी  क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा आपल्यातील कद्रूपणाचा प्रत्यय घडवला आहे.  सचिनच्या वाढदिवसा दिवशीच आपल्या एका वेगवान गोलंदाजाचा वाढदिवस येत असल्याची संधी साधत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर डॅमियन फ्लेमिंगने सचिनचा त्रिफळा उडवतानाचा व्हिडिओ शेअर करून फ्लेमिंगला शुभेच्छा देत सचिनची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या कृत्यावर फॅन्स भडकले असून, त्यांनी वेगवेळ्या पोस्ट टाकत क्रिकेट ऑस्ट्रेलियाची धुलाई केली आहे.

 सचिन तेंडुलकर आणि डॅमियन फ्लेमिंग या दोघांचाही आज वाढदिवस आहेत. त्याच निमित्ताने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने फ्लेमिंगला शुभेच्छा देणारे ट्विट करताना सचिनचा त्रिफळा उडवतानाचा व्हिडिओ पोस्ट केला . मात्र हा व्हिडिओ सचिनला डिवचण्यासाठी पोस्ट करण्यात आल्याचा समज भारतीय क्रिकेटप्रेमींनी करून घेतला. त्यांनंतर या क्रिकेटप्रेमींनी ट्विटरवर वेगवेगळे व्हिडिओ आणि कमेंट्स पोस्ट करून क्रिकेट ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यास सुरुवात केली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने फ्लेमिंगला शुभेच्छा देण्यासाठी पोस्ट केलेला व्हिडिओ भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 30 जानेवारी 2000 रोजी झालेल्या सामन्यातील होता. त्या सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव झाला होता. 2000 साली झालेला हा दौरा भारतीय संघाच्या सर्वात निराशाजनक परदेश दौऱ्यांपैकी एक ठरला होता. त्या दौऱ्यात भारतीय संघाला तीन कसोटी सामन्यांत दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. तर तिरंगी मालिकेत पाकिस्तानविरुद्धचा एकमेव सामना वगळता उर्वरित सामन्यात पराभूत व्हावे लागले होते.  

टॅग्स :सचिन तेंडूलकरक्रिकेटआॅस्ट्रेलिया