मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आगामी सात-आठ वर्षांत महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या १०० आंतरराष्टÑीय शतकांचा विक्रम मागे टाकेल, असा विश्वास आॅस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज ब्रेट ली याने व्यक्त केला.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम तेंडुलकरच्या नावावर आहे. तेंडुलकरने ४९ शतके केली आहेत. तर कोहलीने २४८ सामन्यात ४३ शतके करत या यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. कसोटीमध्येही तेंडुलकरची ५१ शतके आहेत. तर कोहलीने ८६ सामन्यात २७ शतके केली आहेत.
ब्रेट ली म्हणाला, ‘अशी कामगिरी करण्यासाठी प्रतिभा, तंदुरुस्ती व मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. कोहलीमध्ये हे तीनही गुण आहेत.’ तो म्हणाला, ‘एक फलंदाज म्हणून कोहलीकडे अपार गुणवत्ता आहे. त्याची तंदुरुस्तीही उच्च दर्जाची आहे. तिसरी गोष्ट म्हणजे मानसिकता. परदेशी खेळपट्टीवर कठीण स्थितीतून सामना जिंकून देण्याची क्षमता. ’ ली म्हणाला, ‘सचिनला मागे टाकण्यासाठी त्याच्याकडे या तीनही गोष्टी आहेत; मात्र सचिनबद्दल सांगायचे झाले तर कोणी ‘देवाला’ कसे काय मागे टाकू शकतो. त्यामुळे आपल्याला वाट पाहावी लागणार आहे.’(वृत्तसंस्था)