Join us

वडिलांच्या 'त्या' एका निर्णयामुळे बदललं सचिन तेंडुलकरचं आयुष्य

सचिनच्या आयुष्यावरील पुस्तकाचं प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 14:38 IST

Open in App

नवी दिल्ली: 'विनिंग लाईक सचिन: थिंक एँड सक्सिड लाईक तेंडुलकर' या सचिन तेंडुलकरच्या जीवनावरील पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं आहे. सचिन तेंडुलकरच्या आयुष्यातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा उल्लेख या पुस्तकात आहे. यामध्ये सचिन तेंडुलकरचे वडील रमेश तेंडुलकर यांनी सचिनसाठी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाचादेखील उल्लेख आहे. याच निर्णयामुळे सचिनचं संपूर्ण आयुष्य बदललं. 1984 च्या उन्हाळ्यात प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांनी सचिनची शाळा बदलण्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख पुस्तकात आहे. 'वडिलांनी सचिनची शाळा बदलण्याचा निर्णय घेतला आणि या एका निर्णयानं सचिनचं आयुष्यच बदललं. मुंबईच्या वांद्रे इथल्या आईईएस शाळेत क्रिकेटची टीम नव्हती. त्यामुळे सचिनला शारदाश्रम शाळेत पाठवण्याचा सल्ला त्याचे गुरु रमाकांत आचरेकर यांनी दिला. यानंतर जे घडलं ते सगळ्यांना माहित आहे,' असा उल्लेख पुस्तकात आहे. सचिनचं शालेय जीवन, क्रिकेटसाठी त्यानं घेतलेले कष्ट यावर पुस्तकात विस्तृत भाष्य करण्यात आलं आहे. 'सचिनच्या घराजवळून शारदाश्रमला जाण्यासाठी थेट बस नव्हती. त्यामुळे सकाळी लवकर उठून बस बदलून सचिनला शाळेत पोहोचावं लागायचं. साधारणत: 7-8 वीच्या विद्यार्थ्यांना आंतरशालेय क्रिकेट संघात घेतलं जातं. मात्र सचिननं सहावीत असतानाच या संघात स्थान मिळवलं,' असे अनेक प्रसंग या पुस्तकात आहेत. सचिनच्या आयुष्यातलं वडिलांचं स्थान यावरदेखील या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. 'तू फक्त सुट्टीत क्रिकेट खेळ आणि बाकीच्या वेळी अभ्यास कर, असं सचिनच्या वडिलांनी त्याला कधीच सांगितलं नाही. तसं झालं असतं, तर सचिन द सचिन झाला नसता,' असं लेखकानं म्हटलं आहे.   

टॅग्स :सचिन तेंडूलकरक्रिकेट