मुंबई - भारताचा माजी कसोटीपटू विनोद कांबळी याने 'फ्रेंडशिप डे'ला जवळचा मित्र आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर याला शुभेच्छा दिल्या होत्या. बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट 'शोले'तील 'जय-वीरू' यांच्या मैत्रीची आठवण करून देताना कांबळीने ट्विट केले होते. त्याला सोमवारी तेंडुलकरने भावनिक रिप्लाय दिला.
कांबळीला फ्रेंडशिप डेला 'जय-वीरू'ची जोडी आठवली. या जोडीची तुलना त्याने आपल्या जोडीशी केली. तो म्हणाला होता, की मैदानावर तू महान खेळाडू आहेसच आणि मैदानाबाहेर तू माझ्यासाठी ‘जय’ आहेस. या दिवशी मी इतकेच म्हणेन की ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे...'
तेंडुलकरने त्याला उत्तर दिले , की' शोले हा ऐतिहासिक चित्रपट आहे आणि आपली मैत्री जगावेगळी आहे. माझा विचार केल्याबद्दल आभार मित्रा.'
याआधी कांबळीने तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचे अभिनंदन केले होते. १९ वर्षांखालील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना अर्जुनने श्रीलंकेविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय बळी टिपला होता. त्यावेळी कांबळीने ट्विटरवरून आपल्या पुतण्याला भरभरून शुभेच्छा दिल्या होत्या.
'अर्जुनची पहिली विकेट पाहून डोळ्यात आनंदाश्रू तरळले. अर्जुनला मोठं होताना आणि मेहनत करताना पाहिलंय. त्यामुळे हा क्षण आनंददायी आहे. पण ही फक्त सुरुवात आहे. असंच उदंड यश तुला मिळत राहो', अशा भावना विनोद कांबळीने व्यक्त केल्या होत्या. क्रिकेट कारकिर्दीतील पहिल्या विकेटचा मनसोक्त आनंद घेण्याचा सल्लाही कांबळीने दिला होता.