Sachin Tendulkar on Rohit Sharma Test Retirement: भारतीय संघाचा धडाकेबाज कर्णधार रोहित शर्मा याने बुधवारी अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील खराब कामगिरीनंतर रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून त्याने ही माहिती दिली. रोहितने त्याच्या पोस्टमध्ये चाहत्यांच्या प्रेमाबद्दल आभार मानले. टी२० मधून आधीच निवृत्त झालेला रोहित आज कसोटीतूनही निवृत्त झाला. त्यामुळे आता तो केवळ वनडेच्या मैदानातच दिसणार आहे. रोहितने निवृत्ती जाहीर केल्यानंतर मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने खास ट्विट केले.
सचिन काय म्हणाला?
मला आजही आठवतंय की, २०१३ मध्ये मी माझ्या हाताने ईडन गार्डन्सवर तुला टेस्ट क्रिकेटची कॅप दिली होती. नंतर आपण दोघे वानखेडे स्टेडियमच्या बाल्कनीमध्ये उभे असल्याचाही क्षण माझ्या लक्षात आहे. तुझा कसोटी क्रिकेटमधील प्रवास खूपच धडाकेबाज आणि उल्लेखनीय आहे. त्या दिवसापासून ते आजच्या दिवसापर्यंत तू एक क्रिकेटपटू आणि कर्णधार म्हणून भारतीय क्रिकेटला खूप काही दिलंस. वेल डन, रोहित. तुझ्या अप्रतिम कसोटी कारकिर्दीसाठी खूप खूप अभिनंदन. आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.
रोहितने कशी केली निवृत्तीची घोषणा?
कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करताना रोहित शर्माने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. 'भारताच्या कसोटी संघाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. गेल्या काही वर्षांपासून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. मी एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत राहीन', असे रोहित शर्माने म्हटले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीमधील चौथा कसोटी सामना रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला, जो भारताने गमावला होता.
रोहितने ६७ कसोटी सामन्यांमध्ये ४०.५७ च्या सरासरीने १२ शतके आणि १८ अर्धशतकांसह ४ हजार ३०१ धावा केल्या. तसेच २४ कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व केले. यातील १२ सामने जिंकले आणि नऊ सामन्यात संघाला पराभव पत्करावा लागला. रोहितच्या निवृत्तीनंतर आता आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाला नवीन कसोटी कर्णधार मिळणार हे स्पष्ट झाले आहे. जसप्रीत बुमराह, केएल राहुल, शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांची नावे शर्यतीत आघाडीवर आहेत.