क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हटले जाते. तो क्रिकेट इतिहासातील काही महान फलंदाजांपैकी एक आहे. आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक झळकावणारा तो एकमेव खेळाडू आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेवाद्वितीय खेळाडू आहे. मात्र सचिनने केवळ फलंदाजीच नाही तर गोलंदाजीतही काही मोठे विक्रम केले आहेत. आपल्या अप्रतिम फलंदाजीने चाहत्यांना भुरळ घालणारा सचिन नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असतो.
आता सचिनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या जबरा फॅनला भेटल्याचे दिसते. सचिनने या चाहत्यासोबतचा व्हिडीओ पोस्ट करत भारी कॅप्शन दिले आहे. खरं तर सचिन त्याच्या कारने प्रवास करत असतो. तितक्यात त्याला वाटेत त्याची १० नंबरची जर्सी परिधान केलेला एक चाहता दिसतो. मुंबई इंडियन्सच्या जर्सीत असलेल्या चाहत्याजवळ गाडी थांबवून सचिनने रस्ता विचारण्याचा बहाणा केला. क्रिकेटच्या देवाला पाहून चाहत्याला विश्वास बसला नाही. त्याने नमस्कार करून सचिन दिसताच देवाचे आभार मानले.
सचिनने व्हिडीओ शेअर करत म्हटले, "सचिनने घेतली 'तेंडुलकर'ची भेट... माझ्यावर चाहत्यांकडून प्रेमाचा होत असलेला वर्षाव पाहून माझे हृदय आनंदाने भरते. जगाच्या कानाकोपऱ्यांतून येणाऱ्या लोकांचे प्रेमच माझ्या आयुष्याला खास बनवते."
गोलंदाज म्हणूनही सचिनच्या नावावर विक्रमआपल्या फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणारा सचिन गोलंदाजीतही कमी नव्हता. एकाच मैदानावर दोनदा पाच बळी घेणारा सचिन हा पहिला भारतीय गोलंदाज आहे. त्याने १९९८ मध्ये कोची येथे ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाच बळी घेण्याची किमया साधली होती. सचिन तेंडुलकर हा भारतासाठी वन डे सामन्यात बळी घेणारा सर्वात तरूण खेळाडू आहे. त्याने १७ वर्ष २२४ दिवसांचा असताना वन डे सामन्यात बळी पटकावला होता. सचिनने कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-२० च्या एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय सामन्यांतील ४१६ डावांत गोलंदाजी केली आहे. यात त्याला एकूण २०१ बळी घेता आले.