महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) सध्या कुटुंबासोबत काश्मीर दौऱ्यावर आहे. त्याने सोशल मीडियावर काश्मीरचे अनेक फोटो व व्हिडीओ पोस्ट केले आहेत. पण, आज त्याने पोस्ट केलेला व्हिडीओ पाहून सारे भारावले आहेत. मागील महिन्यात तेंडुलकरने सोशल मीडियावर जम्मू-काश्मीरचा दिव्यांग क्रिकेटपटू आमीर हुसैन लोनचा ( Amir Hussain Lone ) व्हिडिओ शेअर केला होता. २०० कसोटी, ४६३ वन डे व १ ट्वेंटी-२० मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सचिननेही या क्रिकेटपटूला भेटण्याची आणि त्याच्या नावाची जर्सी घेण्याची इच्छा व्यक्त केली होती.
तेंडुलकरने काश्मीर दौऱ्यावर आमिरची भेट घेतली. क्रिकेट आयकॉनने इंस्टाग्रामवर आमीरसोबतच्या संवादाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे, “आमिरला, खरा हिरो. प्रेरणा देत रहा! तुम्हाला भेटून आनंद झाला. ”
काश्मीरमधील वाघामा गावातील आमीर हुसैन लोन यांनी वयाच्या आठव्या वर्षी वडिलांच्या गिरणीत काम करताना हात गमावले. पण त्यामुळे त्याचे क्रिकेटवरील प्रेम कमी झाले नाही आणि अखेरीस, एका शिक्षकाने त्याची प्रतिभा शोधून काढली आणि त्याला व्यावसायिक खेळाची ओळख करून दिली.
"दुर्घटनेनंतर मी आशा सोडली नाही आणि कठोर परिश्रम केले. मी स्वत: सर्व काही करू शकतो आणि मी कोणावरही अवलंबून नाही. माझ्या अपघातानंतर मला कोणीही मदत केली नाही. अगदी सरकारनेही मला पाठिंबा दिला नाही पण माझे कुटुंब सदैव तेथे होते," असे आमीर म्हणाला.
"मी २०१३ मध्ये दिल्लीत राष्ट्रीय खेळलो आणि २०१८ मध्ये मी बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामना खेळलो. त्यानंतर मी नेपाळ, शारजा आणि दुबईमध्ये क्रिकेट खेळलो. मला माझ्या पायाने खेळताना (गोलंदाजी) आणि फलंदाजी करताना पाहून सर्वांनाच धक्का बसला. खांदा आणि मान. मला क्रिकेट खेळण्याची ताकद दिल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो," तो पुढे म्हणाला.