Join us

बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम

SRT 100: बीसीसीआयच्या मुंबई मुख्यालयात आता 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम दिसणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 18:10 IST

Open in App

मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये काल (१६ मे २०२५) भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा, दिवंगत क्रिकेटपटू अजित वाडेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाच्या स्टँडचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आज (१७ मे २०२५) बीसीसीआयने क्रिकेटचा देव म्हणून ख्याती असलेला सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान दिला. बीसीसीआयने त्यांच्या मुंबई मुख्यलायतील एका बोर्ड रूमला सचिन तेंडुलकरचे नाव दिले. भारतीय क्रिकेट संघाच्या यशात सचिन तेंडुलकरचा सिंहाचा वाट आहे. त्याच्या योगदानाची दखल घेऊन बीसीसीआयने त्याला सन्मानित केले. बीसीसीआयच्या मुंबई मुख्यालयात 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम दिसणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, स्वत: सचिन तेंडुलकरने या रुमचे उद्घाटन केले.

बोर्ड रूमचे उद्घाटन केल्यानंतर सचिन तेंडुलकर भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. "बीसीसीआयच्या सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानतो, हे अविश्वसनीय आहे. कारण मी प्रत्यक्ष जीवनात असे पहिल्यांदाच पाहत आहे. माझी सुरुवात येथूनच झाली. बीसीसीआयच्या बोर्ड रूमला माझे नाव देणे, हा खरोखरच माझ्यासाठी खूप हृदयस्पर्शी क्षण आहे", असे सचिन तेंडुलकरने बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. दरम्यान, बीसीसीआयने सचिन तेंडुलकर आधी मुंबई मुख्यलायतील एका रूमला भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांचे नाव दिले आहे.

सचिन तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. सचिनने त्याच्या कारकिर्दीत ४८.५२ च्या सरासरीने एकूण ३४ हजार ३५७ धावा केल्या आहेत. यात विश्वविक्रमी १०० शतकांचा समावेश आहे. सचिन कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये अनुक्रमे १५ हजार ९२१ धावा आणि १८ हजार ४२६ धावा करून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. मास्टर ब्लास्टरच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके (५१ शतके) करण्याचा विक्रमही आहे. त्यामुळेच बीसीसीआयने बोर्ड रूम रूमला एसआरटी १०० असे नाव दिले आहे. 

टॅग्स :सचिन तेंडुलकरबीसीसीआय